उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री शिरसाट यांनी केली करमाळा तालुक्यातील पुरग्रस्त भागांची पाहणी; मदतीची दिली हमी -

उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री शिरसाट यांनी केली करमाळा तालुक्यातील पुरग्रस्त भागांची पाहणी; मदतीची दिली हमी

0

करमाळा :  करमाळा तालुक्यातील कोर्टी, संगोबा, सरपडोह व बिटरगाव श्री परिसरात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी बुधवारी (दि.२४) स्वतंत्र दौऱ्यांद्वारे केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोर्टी व संगोबा येथे पिकांचे मोठे नुकसान पाहिले. गोरेवाडी येथील तलावाची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच कोर्टी ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधणीबाबतही चर्चा झाली. पवार म्हणाले, “पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा शासन गांभीर्याने विचार करत आहे. मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही. मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर चर्चा करून लवकरच घोषणा केली जाईल.”

दरम्यान, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सरपडोह येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. महिला शेतकऱ्यांनी यावेळी मोठा आक्रोश व्यक्त करत आपली मागणी सरकारपर्यंत पोहोचवावी, अशी विनंती केली. बिटरगाव येथे बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान त्यांनी प्रत्यक्ष पाहिले व दिलासा दिला. शिरसाट म्हणाले, “नुकसान इतके मोठे आहे की ते शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. मात्र हे सरकार शेतकऱ्यांसाठी संवेदनशील असून योग्य ती मदत दिली जाणार आहे.”

या पाहणी दौऱ्यांमध्ये उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबत आमदार नारायण पाटील, उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील व विविध अधिकारी, नागरिक उपस्थित होते.

सामाजिक न्यायमंत्री शिरसाट यांच्या सोबत शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, वैभवराजे जगताप, शंभूराजे जगताप, चंद्रकांत राखुंडे, संजय शीलवंत आदी मान्यवर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!