उपजिल्हाधिकारी शिंदे दांपत्यांनी रावगाव येथील जि. प .शाळेला दिले २ स्मार्ट टिव्ही भेट
करमाळा (संदेश प्रतिनिधी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘माझी शाळा सुंदर शाळा’ या संकल्पनेला साद देत रावगावचे सुपुत्र उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे आणि उपजिल्हाधिकारी सौ. स्वाती दाभाडे -शिंदे यांनी आपल्या गावातल्या म्हणजेच रावगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला काल (दि.७ फेब्रुवारी) दोन स्मार्ट टिव्ही संच भेट दिले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी २ स्मार्ट टीव्ही भेट दिले.
यावेळी कार्यक्रमाला यश कल्याणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश करे-पाटील, गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, विस्तार अधिकारी सुग्रीव नीळ, केंद्र प्रमुख विश्वनाथ निरवणे, रावगावच्या सरपंच रोहिणी संदीप शेळके, उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी करे-पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, “रावगाव गावात गुणवंत विद्यार्थी तयार व्हावे यासाठी या दोन्ही अधिकाऱ्यांनी शाळेला केलेली मदत वाखण्या जोगी आहे. त्यांचा आदर्श इतर अधिकाऱ्यांनी घेण्या सारखा आहे. असे झाल्यास महाराष्ट्रातील सर्व शाळेची मंदिरे सुंदर झाल्याशिवाय राहणार नाहीत”.
गावच्या शाळेच्या शैक्षणिक सुधारणेसाठी आणि नव तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही नेहमी गावातील ग्रामस्थां सोबत आहोत असे आश्वासन उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे आणि उपजिल्हाधिकारी सौ. स्वाती शिंदे यांनी याप्रसंगी दिले.
यावेळी कार्यक्रमाला विष्णु गर्जे, सुभाष पवार, दादा पवार, प्रविण कांबळे,भास्कर पवार,भाऊसाहेब बुधवंत ,भागवत बरडे ,सुहास जौंजाळ,प्रशालेचे मुख्याध्यापक पाटोळे सर,आणि सर्व शिक्षक,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य आणि सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.