श्री कमलाभवानी मंदिर शासनाने ताब्यात घेऊन पुरातत्व विभागामार्फत मंदिराचे जतन-संवर्धन करावे - भाविक,ग्रामस्थांची मागणी ! - Saptahik Sandesh

श्री कमलाभवानी मंदिर शासनाने ताब्यात घेऊन पुरातत्व विभागामार्फत मंदिराचे जतन-संवर्धन करावे – भाविक,
ग्रामस्थांची मागणी !


करमाळा (संदेश प्रतिनिधी) – श्रीदेवीचामाळ (ता.करमाळा) येथील कमलाभवानीचे पुरातन,ऐतिहासिक मंदिर शासनाने ताब्यात घेऊन पुरातत्व विभागामार्फत मंदिराची देखभाल
दुरुस्ती व जतन-संवर्धन करण्यात यावे अशी देवीचा माळ ग्रामस्थ,पुजारी व भाविकांची मागणी असून शासनाकडे या मागणीचे निवेदन व पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ पत्रकार,मकाईचे माजी संचालक विवेक येवले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. यावेळी अंगद बिडवे,समाधान सोरटे,श्रीराम फलफले,अभिमान पवार,प्रमोद गायकवाड,राजेंद्र पवार,दिलीप चव्हाण,नवनाथ सोरटे,महेश सोरटे,अनिल पवार,पप्पू हिरगुडे,दीपक थोरबोले आदींसह ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.

याविषयी माहिती देताना श्री.येवले म्हणाले की, राजे जानोजी उपाख्य रावरंभा निंबाळकर यांनी सन १७२७ च्या सुमारास बांधलेले हे मंदिर तुळजाभवानीचे प्रतिरूप मानले जाते. पन्नास एकर एवढ्या विस्तीर्ण परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या या मंदिराच्या बांधकामामध्ये हेमाडपंथी,दाक्षिणात्य आणि मोगल बांधकामशैलीचा वापर केलेला आहे. एवढे भव्यदिव्य,विस्तीर्ण आणि विविध बांधकाम शैलीने नटलेले असे सुंदर मंदिर अन्यत्र कुठेही आढळत नाही.

सध्या लोकसहभागातून मंदिर संवर्धनाचे काम हाती घेण्यात आलेले असून यापूर्वीही कमलाभवानीच्या स्वयंभू मूर्तीचा दोनतीन वेळा वज्रलेप तसेच मंदिर जीर्णोद्धार लोकसहभागातून करण्यात आलेला आहे. परंतु हे प्रयत्न तसे तोकडे पडत असल्याने या मंदिर व परिसराचे पिढ्यानपिढ्या जतन होणे गरजेचे असल्याने हे मंदिर पंढरपूर,तुळजापूर येथील मंदिरांप्रमाणे शासनाने ताब्यात घ्यावे व या पुढे कायमस्वरूपी या मंदिराचे जतन-संवर्धन व देखभाल पुरातत्व विभागामार्फत करण्यात यावे अशी मागणी भाविक व देवीचा माळ, करमाळा येथील नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,विधी व न्याय विभाग,पुरातत्व विभाग, आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी येवले यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!