पारंपरिक वेशभूषेत गौंडरेतून निघाली विद्यार्थ्यांची बाल दिंडी – गावात भक्तीमय वातावरण

केम (संजय जाधव) – आषाढी वारीच्या निमित्ताने धर्मवीर संभाजी विद्यालय, गौंडरे येथे पारंपरिक पद्धतीने भक्तिमय वातावरणात विद्यार्थ्यांची बाल दिंडी साजरी करण्यात आली. या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत विठ्ठल-रुक्मिणी व विविध संतांची रूपं सादर केली आणि संपूर्ण गावात भक्तीमय वातावरण निर्माण केले.


या दिंडी सोहळ्यात इयत्ता आठवीतील प्राची गणेश निळ हिने विठ्ठल तर प्रणिती भरत खंडागळे हिने रुक्मिणीची वेशभूषा साकारली. करण पारेकर यांनी संत ज्ञानेश्वर तर सार्थक तळेकर यांनी संत तुकाराम महाराज यांची भूमिका सादर केली. गावातील भजनी मंडळ देखील या सोहळ्यात सहभागी झाले होते. इयत्ता पाचवी ते दहावीमधील मुलींनी पारंपरिक नृत्य, फुगड्या, भिंगरी खेळ सादर करत भजनाच्या माध्यमातून भक्तीचे वातावरण निर्माण केले.

दहावीतील सुरज ज्योतीराम काशविद याने कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. “झाडे लावा, झाडे जगवा” या संकल्पनेवर आधारित संदेश वसुंधरा परिवार या उपक्रमातून देण्यात आला आणि या निमित्ताने झाडांचे वाटपही करण्यात आले.

कार्यक्रमाला ह. भ. प. विजय खंडागळे महाराज, आप्पासाहेब अंबारे, बाळू सुतार, अरुण ननवरे, गंगाराम माने, खोडेकर सर आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय खंडागळे, नागनाथ सपकाळ, महावीर कोपनर, अनिल पारेकर, शिवाजी खंडागळे, युवा वर्ग तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.



