खचलेल्या डिकसळ पुलाची दिग्विजय बागल यांच्याकडून पाहणी – तातडीने दुरुस्तीची केली मागणी

करमाळा(दि.२८): पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या कोंढार चिंचोली (ता. करमाळा) ते डिकसळ (ता. इंदापूर) मार्गावरील उजनी जलाशयातील ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाचा काही भाग नुकताच कोसळल्याने त्या भागातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते दिग्विजय बागल यांनी रविवार, दि. २७ जुलै रोजी घटनास्थळी भेट देऊन पुलाची पाहणी केली.

पाहणीदरम्यान बागल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कोसळलेल्या पॅराफिटच्या भागाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली. या वेळी पश्चिम भागातील २० ते २५ गावांमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सध्या या पुलावरील हलकी चारचाकी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना दळणवळणाच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दुचाकी व इतर हलक्या वाहनांसाठी ब्रिटिश कालीन पुलाची तातडीने दुरुस्ती व्हावी, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली. तसेच नव्याने सुरू असलेल्या पर्यायी पुलाचे काम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जलद गतीने पूर्ण करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली.

या नागरिकांच्या मागण्यांची दखल घेत दिग्विजय बागल यांनी लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन दोन्ही पुलांच्या कामांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब पांढरे, रामभाऊ हाके, अजित झांझुर्णे, गणेश झोळ, दत्तात्रय गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.


