दिग्विजय बागल वाचनालयात उभारली पुस्तकांची गुढी…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : मांगी (ता.करमाळा) येथे दिग्विजय बागल सार्वजनिक वाचनालय मध्ये ‘पुस्तकांची गुढी’ उभा करून मराठी नववर्ष दिन गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. या नावीन्यपूर्ण उपक्रमाविषयी बोलताना सुजित तात्या बागल म्हणाले की, ग्रामीण भागातील दोन मजली इमारत असलेलं करमाळा तालुक्यातील हे एकमेव प्रशस्त ग्रंथालय असून या ग्रंथालयाला या वर्षी 25 वर्षे पूर्ण होत आहेत.
या निमित्त गावातील नागरिकांना, तरुणांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून वाचन परंपरेच्या प्रचार आणि प्रसारासाठी वाचनाची गुढी हा उपक्रम आज आम्ही राबविला.
दिग्वीजय बागल सार्व वाचनालयाची स्थापना 1997 मध्ये झाली असून सध्या वाचनालयाला ब वर्ग मिळालेला आहे . वाचनालयात 10000 ग्रंथ संपदा उपलब्ध असून यावर्षी वाचनालयाला 25 वर्षे पूर्ण झालेली आहेत. हे ग्रामीण भागामधील एकमेव ब वर्गाचे वाचनालय असून वाचनालय मध्ये गावातील तरुणांना अभ्यास करण्यासाठी 30 विद्यार्थ्यांची स्वतंत्र अभ्यासिका तयार करण्यात आलेली आहे तसेच वाचनालयाच्या परिसरामध्ये प्रसन्न असं वातावरण तयार करण्यात आलेलं आहे.