दळणवळणाच्या असुविधांचा कुंकू उद्योगाला फटका; रोपळे-केम-कंदर  रस्ता तातडीने दुरुस्तीची मागणी -

दळणवळणाच्या असुविधांचा कुंकू उद्योगाला फटका; रोपळे-केम-कंदर  रस्ता तातडीने दुरुस्तीची मागणी

0

केम (संजय जाधव): रोपळे-केम-कंदर मार्गाची सध्या मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून या रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून होत आहे. हा रस्ता टेंभुर्णी – अहिल्यानगर या महामार्गाला जोडणारा असल्यामुळे येथे वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत असून अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.



कंदर ते केम हे सुमारे १४ किलोमीटर अंतर असले तरी खराब रस्त्यामुळे हे अंतर पार करण्यासाठी जवळपास पाऊण तास वेळ लागतो.  केम हे गाव कुंकू उद्योगासाठी देशात प्रसिद्ध असले तरी येथील दळणवळणाच्या असुविधांचा कुंकू उद्योगाला jeफटका बसत आहे. परिणामी अनेक कुंकू कारखाने शहरांकडे स्थलांतरित होऊ लागले आहेत.

याचबरोबर, आपत्कालीन परिस्थितीत गंभीर रुग्णांना अकलूज किंवा इंदापूर येथील रुग्णालयात नेण्यासाठी या रस्त्याचा मोठा अडथळा निर्माण होत आहे. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे वेळेत उपचार मिळू न शकल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्याचे नागरिकांनी सांगितले.



दरम्यान, भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. मात्र यावर अजून कार्यवाही होणे प्रलंबित आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान सौ.कल्याणी अजित तळेकर यांच्या प्रचाराच्या सभेत स्थानिक नेते अजित तळेकर यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती. यावर आमदार पाटील यांनी या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, आमदार नारायण पाटील यांनी तातडीने लक्ष घालून रोपळे-केम-कंदर रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत प्रयत्न करावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!