‘मकाई’च्या चेअरमनपदी दिनेश भांडवलकर बिनविरोध..

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : मकाई सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी नूतन संचालक दिनेश भांडवलकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीसाठी मकाईचे ज्येष्ठ संचालक बाळासाहेब पांढरे यांनी अनुमोदन दिले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी सोपान टोंपे हे होते.
मकाई सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळी सकाळी अकरा वाजता चेअरमन निवडीची बैठक संपन्न झाली. यावेळी बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल, तसेच मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांच्यासह सर्व नूतन संचालक काही सभासद व प्रभारी कार्यकारी संचालक हरिश्चंद्र खाटमोडे उपस्थित होते. या निवडीच्या वेळी नेत्यांच्या सूचनेनुसार दिनेश भांडवलकर यांचा एकमेव अर्ज सादर झाला. त्यास सर्व संचालकांनी अनुमोदन दिले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी श्री. भांडवलकर हे चेअरमन झाल्याचे जाहीर केले. रश्मी बागल तसेच दिग्विजय बागल यांनी श्री.भांडवलकर यांचे अभिनंदन करून कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘साप्ताहिक संदेश’ ने अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे श्री. भांडवलकर यांची निवड झाली आहे.
कारखाना सक्षम करू – श्री.भांडवलकर…..
मकाई सहकारी साखर कारखाना हा सध्या आर्थिक अडचणीत असलातरी आमच्या नेत्या रश्मी बागल व नेते दिग्विजय बागल यांच्या मार्गदर्शनाखाली मेहनत घेऊन कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम करू. ऊस उत्पादक तसेच वाहन मालक व अन्य काही व्यापाऱ्यांची देणी आहेत. ती तातडीने देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. कारखान्याच्या उपपदार्थ निर्मितीकडे लक्ष देऊन पुढील हंगामात जास्तीत जास्त गाळप कसे हे ही पाहिले जाईल, असेही श्री. भांडवलकर यांनी सांगितले.

