कर्नाटक सरकारचा ‘युवा कुंचाकलाश्री’ सन्मान दिपाली खुळे यांना प्रदान

करमाळा: कर्नाटक सरकारतर्फे चित्रकला शिल्पी डी. व्ही. हलभावी नॅशनल मेमोरियल, धारवाड यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘युवा कुंचाकलाश्री पुरस्कार – 2025’ करमाळा येथील चित्रकार दिपाली संदेश खुळे यांना प्रदान करण्यात आला. डी. व्ही. हलभावी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभात त्यांना प्रशस्तिपत्रक आणि पंचवीस हजार रुपयांचे मानधन प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावर्षी देशभरातील निवडक चार चित्रकारांची या पुरस्कारासाठी निवड झाली.

दिपाली खुळे गेली बारा वर्षे चित्रकला क्षेत्रात सक्रिय असून दुबई, मुंबई, कोलकाता, दिल्ली, बेंगळुरूसह विविध शहरांतील गट प्रदर्शनांत त्यांनी सहभाग नोंदवला आहे. मुंबईतील प्रतिष्ठित जहांगीर आर्ट गॅलरी येथे त्यांच्या दोन एकल प्रदर्शनांचे आयोजन झाले होते. आगामी 2026 साली त्यांचे आणखी एक एकल प्रदर्शन नियोजित आहे. दिपाली यांचे पती संदेश खुळे हे देखील प्रसिद्ध चित्रकार असून विविध शहरात त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरले आहेत. सध्या ते मुंबईमध्ये वास्तव्यास आहेत.
समारंभादरम्यान दिपाली खुळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांसाठी आणि कला रसिकांसाठी चित्र प्रात्यक्षिक सादर केले. तसेच आपल्या बारा वर्षांच्या चित्रकला प्रवासाचा स्लाईडशो सादर करत अनुभव, प्रवास आणि कलादृष्टिकोन मांडला.


याविषयी प्रतिक्रिया देताना दिपाली खुळे म्हणाल्या की, त्यांच्या चित्रांची मुख्य संकल्पना म्हणजे लहान मुलगी ते परिपक्व स्त्री आणि मातृत्वापर्यंतचा भावनिक प्रवास आहे. डोळ्यात स्वप्ने घेऊन कल्पनांच्या जगात रंग भरत मोठी होणारी एक छोटी मुलगी… आव्हानांना सामोरी जात स्वतःची ओळख शोधते आणि एका दिवसात स्त्री म्हणून उभी राहते. पुढे मातृत्व स्वीकारताना ती विश्वाची आई बनते. निष्पाप बालपणापासून सर्जनशील मातृत्वापर्यंतचा हा प्रवासच माझ्या चित्रांचा आत्मा आहे.”

रंग, रेषा व भावनांच्या माध्यमातून हा प्रवास व्यक्त करताना त्या कधी उजळ रंगांनी मुलींची स्वप्ने मांडतात, तर कधी संयत छटांत तिचे विचार रेखाटतात. काही चित्रांमध्ये प्रश्न दडलेले असतात, तर काही ठिकाणी हास्यामुळे जीवनाचा अर्थ खुलतो. त्यांच्या कलाकृती स्त्री ही व्यक्तिरेखा नसून एक प्रक्रिया, शक्ती आणि सततचा प्रवास आहे, असा संदेश देतात.
माझ्या प्रत्येक चित्रातून एक कथा सांगण्याची इच्छा असते—अशी कथा, जी प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करते आणि त्यांना विचार करायला प्रवृत्त करते.

