“साध्या माणसांनी मला स्पेशल माणसात बसवल” – दिग्दर्शक मंगेश बदर
करमाळा (सूरज हिरडे) – “साध्या माणसांनी मला स्पेशल माणसात बसवल” या शब्दात करमाळा तालुक्यातील घोटी गावचे सुपुत्र व ‘मदार’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक मंगेश बदर यांनी फ्रान्स देशातील कान्स या ठिकाणी मनोगत व्यक्त केले. कान्स चित्रपट महोत्सवाच्या बाजार विभागासाठी ‘महाराष्ट्र शासना कडून ‘मदार’ या सिनेमाची निवड करण्यात आली होती. त्यानिमित्ताने मंगेश बदर हे फ्रान्स देशातील कान्स येथे गेले आहेत.
याविषयी पुढे बोलताना ते म्हणाले की, करमाळा तालुक्यातील घोटी या माझ्या गावातील पाण्याचे दुर्भिक्ष्य दाखवून लोकांना भेडसावत असलेला प्रश्न मांडण्यासाठी ‘मदार’ हा चित्रपट बनविला. हा चित्रपट बनविताना कुणी मोठे स्टार कलाकार न घेता माझ्या गावाकडील रोजचे सामान्य जीवन जगणाऱ्या साध्या माणसांना गोळा करून हा चित्रपट बनविला. यात अमृता अगरवाल,आदिनाथ जाधव,आदिनाथ केवडे, भागाबई दुधे,सयाजी थोरात,पांडुरंग राऊत,पिंटू राऊत व गावातील इतर कलाकार आहे. या चित्रपटाला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ५ पुरस्कार मिळाले आहेत. विविध महोत्सवात नामांकन व पुरस्कार मिळाले आहेत.
या कामगिरीमूळे मला आज फ्रांस देशातील कान्स येथील महोत्सवात येता आले व जगातील चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांमध्ये वावरता आले. याबरोबरच उत्कृष्ट दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल,उत्कृष्ट चित्रपट अभ्यासक अशोक राणे,सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे (IAS), चित्रपट महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे (IAS), महामंडळाचे वित्तीय सल्लागार वित्तधिकारी राजीव राठोड,सचिन मुल्लेमवार यांच्यात सन्मानपूर्वक बसता आले याचे मला खूप समाधान आहे.
मराठी चित्रपटांनां आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळावे यासाठी महामंडळामार्फत २०१६ पासून कान्स महोत्सवात सहभाग घेतला जात आहे. यंदा या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला १७ मे पासून प्रारंभ झाला आहे.या महोत्सवाच्या बाजार विभागात महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचा आकर्षक स्टाॅल उभारण्यात आला आहे. यंदा महोत्सवाच्या बाजार विभागासाठी संदीप सावंत दिग्दर्शित “या गोष्टीला नावच नाही”, सचिन मुल्लेमवार दिग्दर्शित “टेरिटेरी” आणि मंगेश बदर दिग्दर्शित “मदार” सिनेमांची निवड करण्यात आली. या तिन्ही चित्रपटांचे प्रतिनिधी कान येथे उपस्थित आहेत.
मंगेश बंदर यांनी चित्रपट सृष्टीत येण्याआधी वेगवेगळी छोटी मोठी कामे केली आहेत. मोबाईल रिपेअरींगची कामे अनेक दिवस केली आहेत, काही दिवस दूध वाटले आहे, व्हिडिओ सेंटरमध्ये ऑपरेटर म्हणून काम केले आहे, मुंबईमधील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून देखील काम केले आहे. रेल्वेमध्ये मोबाईल कव्हर विक्री करण्याचे काम केले आहे, पुण्यात एका कंपनी मध्ये काही दिवस काम केले आहे असे एक ना अनेक छोटी मोठी कामे मंगेश यांनी केली आहेत.