मकाई कारखाना कामगारांचे ठिय्या आंदोलन – प्रशासनाच्या ताठर भूमिकेमुळे चर्चा निष्फळ

करमाळा (दि.१३): करमाळा तालुक्यातील मकाई कारखान्यातील कामगारांनी आपले थकीत पगार मिळवण्यासाठी कारखाना गेटसमोर १० जुलैला सकाळी आठ वाजल्यापासून ठिय्या आंदोलन सुरू केले होते.
या आंदोलनात मोठ्या संख्येने कामगारांनी सहभाग नोंदवला. कामगारांची प्रमुख मागणी शंभर टक्के एकरकमी पगार देण्याची होती.

कारखान्याचे संचालक बाळासाहेब पांढरे, एम.डी. श्री. दळवी आणि जनरल सेक्रेटरी हरिश्चंद्र खाटमोडे यांनी आंदोलक कामगारांशी संवाद साधला. प्रारंभी कामगारांनी आपली 100% एकरकमी पगार मिळवण्याची ठाम भूमिका मांडली. मात्र कारखान्याच्या एकूण परिस्थितीचा विचार करून त्यांनी आपल्या मागणीत लवचिकता दाखवत 60% एकरकमी पगार आणि उर्वरित 40% रक्कम दरमहा पगाराबरोबर एक पगार हप्त्याने देण्याचा पर्याय सुचवला.

तथापि, प्रशासनाकडून केवळ 5% वाढ करत 25% इतकाच एकरकमी पगार देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. उर्वरित 75% पगाराविषयी कोणतीही भूमिका घेण्यास प्रशासन तयार नव्हते. यामुळे चर्चा कोणत्याही ठोस निष्कर्षाशिवाय संपुष्टात आली.

कारखान्याच्या वतीने सांगण्यात आले की, कामगारांची मागणी बोर्ड मिटिंगमध्ये मांडली जाईल आणि येत्या सात दिवसांत निर्णय जाहीर करण्यात येईल. त्या बैठकीस कामगार प्रतिनिधींनाही बोलावण्यात येणार आहे. दरम्यान, आंदोलनादरम्यान पोलीस प्रशासनाने योग्य बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. कामगारांनी संयम राखून आपली भूमिका आक्रमकपणे मांडली असून, पुढील निर्णयाची वाट पाहत आहेत.




