सामाजिक कार्यकर्त्या मनिषा साठे यांच्या मार्फत प्राथमिक शाळांना ‘ढोल’ वाटप..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.२१) : सामाजिक कार्यकर्त्या मनिषा अजित साठे यांच्या मार्फत करमाळा शहर व तालुक्यातील प्राथमिक शाळांना ‘ढोल’ वाटप करण्याचा कार्यक्रम नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक चार येथे आयोजीत करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे केंद्रसमन्वयक दयानंद चौधरी हे होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या मनिषा साठे , अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या श्रीमती ज्योती पांढरे तसेच स्मिता आवटे, आराधना परदेशी आणि नोबेल इंग्लीश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. आसादे तसेच नगर परिषद शाळा क्रमांक चार च्या मुख्याध्यापिका चंद्रकला टांगडे व लाभार्थी शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना सौ.साठे म्हणाल्या कि, मला लहान पणापासूनच समाजकार्याची आवड होती. माझे पती अजित साठे यांनीही मला माझ्या या कार्यात सतत प्रोत्साहन व पाठबळ दिल्याने माझे हे कार्य मी अखंडपणे चालू ठेवण्यात यशस्वी झाले आहे, सरकारी शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हे गोरगरीबांची मुले असतात. त्या शाळांना सर्वच भौतीक सुविधा उपलब्ध होत नसतात.
त्यामुळे शाळांची भौतिक साधनांची गरज लक्षात घेऊन आपणही या मुलांसाठी काहीतरी करावं असा विचार माझ्या मनात आला, स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनावेळी होणारे तालबद्ध संचलन आणि सामुदायिक कवायत माझ्या आवडीचे असल्याने या उपक्रमाला उपयोगी पडेल असे संगीत साहित्य म्हणून ढोल देण्याचे ठरवले.
प्राथमिक शाळेतच मुलांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांचे शिक्षण आनंददायी व्हावे यासाठी दहा उपक्रमशील शाळांची निवड करून त्यांना आज ढोल वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या पोथरे, जातेगाव, पांडे, खडकेवाडी, आळजापूर, करंजे, पिंपळवाडी आणि नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक ४ व कै .सा .ना जगताप मुला मुलींची शाळा तसेच नोबल इंग्लीश स्कूल करमाळा या शाळांना या ढोलचे वाटप मनिषा साठे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सौ.टांगडे यांची मुख्याध्यापिका म्हणून नियुक्ती झालेबद्दल सौ.साठे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तर जिल्हा परिषद शाळांच्या वतीने करंजे शाळेचे मुख्याध्यापक श्री.लष्कर सर यांच्या हस्ते सौ.साठे यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शकूर शेख यांनी आपल्या भाषणातून सौ.साठे यांच्या आपल्या मुलीचा वाढदिवस मूक बधिर शाळेतील मुलांसमवेत , अपंगासाठी सायकल वाटप करून तर स्वतःचा वाढदिवस अनाथाश्रमातील लोकांना आवश्यक साहित्याचे वाटप करून समाजासमोर अनुकरणीय असा आदर्श निर्माण करणाऱ्या साठे कुटुंबियांच्या कौतुकास्पद कार्याचे कौतुक करून त्यांना दिर्घायुष्य लाभो अशी ईच्छा व्यक्त केली. यावेळी श्री.गभाले सर , श्री.लष्कर सर ,सौ.टांगडे आणि श्री.चौधरी यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष माने सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुकुंद मुसळे आणि बाळू दुधे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार श्रीमती भोसले यांनी मानले.


