राजाभाऊ तळेकर विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत नोट्सचे वाटप

केम(संजय जाधव):केम येथील राजाभाऊ तळेकर विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी व जगदाळे कोचिंग क्लासेस यांच्या वतीने मोफत शालेय नोट्सचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन महेश तळेकर, सचिव मनोज तळेकर व सदस्य नागनाथ तळेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे माजी अध्यक्ष व जगदाळे कोचिंग क्लासेसचे संचालक गोविंद जगदाळे, विद्यमान अध्यक्ष भरत चव्हाण, सचिव वसंत ढवळे व संचालक सदाशिव जाधव उपस्थित होते.
राजाभाऊ तळेकर विद्यालयाच्या निसर्गरम्य परिसरात हा कार्यक्रम पार पडला. अजित दादा पवार विद्यालय, वडशिवणे आणि शारदाताई गोविंदराव पवार विद्यालय, केम येथील सुमारे ८० विद्यार्थी व शिक्षक कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

आपल्या मनोगतात गोविंद जगदाळे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्वतःला कमी न लेखता ध्येयप्राप्तीसाठी शंभर टक्के प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. वडशिवणे येथून शिक्षण घेऊन मागील ३० वर्षांपासून पिंपरी-चिंचवड, पुणे येथे कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या जगदाळे यांनी समाजोपयोगी उपक्रमांद्वारे आदर्श निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यालयातील निसर्गरम्य वातावरण व विद्यार्थ्यांची शिस्त याबद्दलही गोविंद जगदाळे यांनी विशेष प्रशंसा केली. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

