रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने भोगेवाडी येथील शिंदे विद्यालयाला मोफत नोट्सचे वाटप

करमाळा (दि. २०): “ग्रामीण भागातील असल्याचा कोणताही न्यूनगंड विद्यार्थ्यांनी बाळगू नये. ग्रामीण भागातील विद्यार्थीही शहरी विद्यार्थ्यांइतकेच सक्षम असून त्यांनी ध्येय उंच ठेवावे व सातत्याने अभ्यास करावा. ग्रामीण-शहरी असा भेद न करता भारतीय प्रशासकीय सेवेतही ग्रामीण भागातील मुले मोठ्या पदावर पोहोचू शकतात,” असे प्रतिपादन रोटरियन गोविंद जगदाळे(माजी अध्यक्ष तथा रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे चेअरमन, जगदाळे कोचिंग क्लासेसचे संस्थापक) यांनी केले. भोगेवाडी येथील संजय मामा शिंदे माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने मोफत नोट्सचे वाटप करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष रोटरियन भरत चव्हाण, सचिव रोटरियन वसंत ढवळे, डायरेक्टर रोटरियन सदाशिव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रोटरियन गोविंद जगदाळे यांनी, वडशिवणे येथील डॉ. भगवंत पवार यांनी यूपीएससी परीक्षेत मिळवलेल्या यशाचे उदाहरण देत त्यांनी विद्यार्थ्यांना जिद्दीने शिक्षण घेऊन आपल्या गावाचे, पालकांचे व शाळेचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले.

रोटरियन भरत चव्हाण यांनी विद्यार्थ्यांनी जीवनात कष्टाला महत्त्व द्यावे, असे सांगत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या व पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावी-बारावीच्या शिक्षणासाठी दरमहा ५०० रुपये शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली. रोटरियन वसंत ढवळे यांनीही विद्यार्थ्यांना शिक्षणातून मोठे होण्याचा सल्ला दिला. रोटरियन सदाशिव (आबा) जाधव यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास १०० रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
संस्थेचे सचिव रोहन टोणपेसर यांनी परीक्षेत उत्तरपत्रिका कशी लिहावी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष नंदकुमार हरिदास टोणपेसर व कोषाध्यक्ष डॉ. रोहित टोणपे यांनी समाधान व्यक्त केले. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

