जगताप गुरुजींच्या स्मरणार्थ – गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप

करमाळा (दि.३): महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांडे येथे ‘स्व. शिवाजी गुरुजी शिष्यवृत्ती’चे वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या प्रसंगी विविध मान्यवरांच्या हस्ते व जगताप परिवाराच्या उपस्थित ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
जगताप गुरुजी यांनी शिक्षण घेतलेल्या याच शाळेत पुढे मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख म्हणून त्यांनी आपली वेगळी छाप उमटवली होती. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी ही शिष्यवृत्ती देण्याचा उपक्रम जगताप परिवाराने सुरू केला आहे.

यावर्षी इयत्ता सातवीमध्ये उत्कृष्ट गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावलेल्या तनिष्का मनोहर घाडगे हिला तसेच मुलींमध्ये प्रथम आलेल्या गौरी सिद्धनाथ घोरपडे हिला स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि शिष्यवृत्तीची रक्कम प्रदान करण्यात आली. दोन्ही विद्यार्थिनींच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाला नवनाथ जगताप व परिवार, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब अनारसे, संदिपान दुधे, शिवाजी भोसले, पत्रकार दस्तगीर मुजावर तसेच इतर मान्यवर, ग्रामस्थ आणि शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उपस्थित होते.