जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धाब्यावर- साडे हायस्कूलच्या मुख्याध्यापकांविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा / संदेश प्रतिनिधी : जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कुमार आशीर्वाद यांनी 23 आणि 24 सप्टेंबर रोजी सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टीचा आदेश जारी केला होता. मात्र या आदेशाचा भंग करत करमाळा तालुक्यातील साडे हायस्कूल, साडे येथील मुख्याध्यापकांनी 24 तारखेला शाळा सुरू ठेवून तब्बल 600 विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.

गटशिक्षण अधिकाऱ्यांनी या प्रकरणी करमाळा पोलिसांत फिर्याद नोंदवली असून, मुख्याध्यापकांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उत्तर सोलापूर (ग्रामीण), माढा, करमाळा, बार्शी, मोहोळ व दक्षिण सोलापूर (ग्रामीण) येथील सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आदेशात नमूद होते.

तरीदेखील साडे हायस्कूलमध्ये नियमितप्रमाणे वर्ग भरवण्यात आले. विशेष म्हणजे अनेक विद्यार्थी वाड्या-वस्त्यांवरून ३ ते ४ किलोमीटर अंतर चिखलातून, पाणथळ मार्ग ओलांडून पायी किंवा सायकलवरून आले. अतिवृष्टीमुळे आधीच पुराचा धोका असतानाही त्यांच्या जीवितास धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. स्थानिक पालकांनी या बेपर्वाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून संबंधित मुख्याध्यापकांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. पुढील तपास करमाळा पोलीस करत आहेत.




 
                       
                      