गणेशोत्सव मिरवणुकांमध्ये डॉल्बी व लेझर लाईटवर बंदी – जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

करमाळा(दि.३०): सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश जारी करून दि. 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत होणाऱ्या गणेशोत्सव मिरवणुकांमध्ये डॉल्बी सिस्टीम आणि लेझर लाईटच्या वापरावर बंदी घातली आहे.

मागील वर्षी डॉल्बीच्या प्रचंड आवाजामुळे काही नागरिकांना कान व छातीचा त्रास होऊन अपंगत्वाचा धोका निर्माण झाला होता. तसेच लेझर लाईट डोळ्यावर पडल्यामुळे वयोवृद्ध आणि लहान मुलांना डोळ्यांची इजा झाल्याच्या घटना घडल्या होत्या. याबाबत ज्येष्ठ नागरिक संघटनांनी तक्रार केली होती.

या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी, सोलापूर (क्र. 1) यांनी सादर केलेल्या अहवालानुसार जिल्हादंडाधिकाऱ्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163(1) अंतर्गत हा आदेश काढला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या निर्णयाचे सुज्ञ नागरिकांकडून स्वागत करण्यात आलेले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी गणेशोत्सव काळात डिजे वापरण्यावर बंदी घातली असल्याने सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य लेझीम आणि ढोल यांचा वापर करावा. जे मंडळ डॉल्बी लावून आदेशाचे उल्लंघन करतील त्या गणेश मंडळावर कारवाई करण्यात येईल. – तहसीलदार शिल्पा ठोकडे


