देवीचमाळ येथील मूकबधिर निवासी विद्यालयात दिव्यांग दिन उत्साहात साजरा
करमाळा (दि.४) – श्री देवीचामाळ (ता.करमाळा) येथील श्री जगदंबा कमला भवानी मूकबधिर निवासी विद्यालयात ३ डिसेंबर रोजी असणारा जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा देखील घेण्यात आल्या होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर हेलन केलर व संस्थेचे संस्थापक कै.पाथरूट गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लीड स्कूलचे प्राचार्य बिपिन दास हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय काळे व शिक्षक शंकर येलाले हे उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बिपिन दास यांनी डॉ. हेलन केलर यांच्या कार्याची माहिती दिली व मूकबधिर मुलांचे विशेष कौतुक केले त्यांच्या अंगी असलेल्या विविध गुणांचे चित्रकला हस्तकला अध्ययन इत्यादी बाबींमध्ये चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे असे त्यांच्या भाषणामध्ये सांगितले.
दिव्यांग दिनानिमित्त विद्यालयात विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय वह्या व टी-शर्ट वाटप करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक काळे सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. व त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानदेव गुरमे यांनी केले. तर आभार विशेष शिक्षक गणेश सातपुते सर केले. व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.