डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे आला बहिरेपणा – मंडळाविरोधात गुन्हा दाखल

करमाळा(दि.२२): डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे सोलापूर येथील एका ५८ वर्षीय व्यक्तीस कायमचा बहिरेपणा आल्याची घटना घडली आहे.

याबाबत हकीकत अशी की, सोलापूर येथील कोयनानगर भागातील बी जे ग्रुप मंडळाच्या वतीने शिवजयंती मिरवणुकीसाठी डीजे लावला होता. या डीजेमुळे परिसरात दणाणून गेला होता. यावेळी तेथील रहिवाशी राजू यादगिरीकर यांनी या मंडळाच्या कार्यकर्त्यांना सांगितले की, आमच्या घरात ८० वर्षांची आजारी आई झोपली असून डीजेच्या आवाजामुळे तिला त्रास होतो आहे. थोडा आवाज थोडा कमी कराव अशी विनंती केली. यावर या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी डीजेचा आवाज तर कमी केलाच नाही परंतु यादगिरीकर यांना तिथेच बसवून घेतले. त्यामुळे यादगिरीकर यांच्या कानाला इजा झाली. घरी आल्यानंतर त्यांच्या डोक्याला मुंग्या येऊ लागल्या व काहीच ऐकू येत नाही असे त्यांनी पत्नीला सांगितले. त्यानंतर जवळील दवाखान्यात उपचारास गेल्यावर डॉक्टरांनी त्यांना कायमचा बहिरेपणा आला असून यापुढे श्रवण यंत्राशिवाय ऐकूच येणार नाही असे सांगितले.यानंतर सदर मंडळाविरोधात सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.




