जाट, पाटीदार आंदोलनात जे झाले तसे करू नका.. मराठा बांधवांचे आवाहन - Saptahik Sandesh

जाट, पाटीदार आंदोलनात जे झाले तसे करू नका.. मराठा बांधवांचे आवाहन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – राज्यात ठीक ठिकाणी मराठा आरक्षणाचे आंदोलन सूरु आहे. साखळी उपोषण,आमरण उपोषण, कॅन्डल मार्च अशा प्रकारे शांतपणे सुरू असलेल्या या आंदोलनाला आता अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. अनेक ठिकाणी एसटी बस जाळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू झाले आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान सुरू करण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे जाट, पाटीदार आंदोलनात जे झाले तसे मराठा आंदोलनात करू नका असे आवाहन मराठा आंदोलनकर्त्यांनी संतप्त मराठा आंदोलनकर्त्यांना केले आहे. याविषयीच्या पोस्ट सोशल मीडिया मधून येत आहेत.

२०१६ मध्ये हरियाणा मधून सुरू झालेले जाट आरक्षण पंजाब, राजस्थान मध्ये गेले. कालांतराने जाट आरक्षणच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यातून हरियाणा एकट्या राज्याचे जवळपास १८ ते २० हजार कोटींच्या सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे नुकसान झाले. तर उत्तरेकडील राज्यांचे मिळून ३४ हजार कोटी सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे नुकसान झाले. यात पेट्रोल पंप, मॉल, बस, रेलवे गाड्या जाळण्याचे प्रकार घडले. अनेक खाजगी कंपन्यानी आपले कामकाज थांबविले. हातावर पोट असणाऱ्यांचा रोजगार थांबला. अनेकांवर गुन्हे दाखल झाले. यातून संपूर्ण देशात जाट समाज बदनाम झाला. अखेर यातून जाट आरक्षणच्या मागणीसाठी होत असलेल्या आंदोलनातील हवाच निघून गेली.

असाच प्रकार गुजरात मध्ये पाटीदार समाज आरक्षण आंदोलनावेळी (२०१५) देखिल झाला.सुरवातीला ५५ दिवस शांततेत सुरू झालेले आंदोलनाला हिंसक वळण लागले. ह्या हिंसक वळणामुळे गुजरात मध्ये जवळपास ४५ कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले. परिणामी शांततेच्या मार्गाने अन् संविधानिक मार्गने आरक्षणाची मागणी करणारा “पटेल समुदाय” बदनाम झाला.पुढे पटेल आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याची कुणाचीच हिंमत नाही झाली.

महाराष्ट्रात २०१६ पासून मराठा आरक्षण संदर्भात अनेक मूक मोर्चे निघाले. इतक्या मोठ्या प्रमाणात एकत्र जमा झालेल्या मराठा समाजाने अत्यंत शांतपणे आंदोलने केली आहेत. ज्याचे संपूर्ण देशात कौतुक करण्यात आले. परंतु गेले काही दिवसांपासून अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागत चालले आहे. बीडसह, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जाळपोळ झाली, आमदार, लोकप्रतिनिधींची घरे कार्यालय आणि वाहने जाळण्यात आली. मराठा समाजाच्या आंदोलनाचा फायदा काही समाज कंटक लोक घेऊन ‘पाहुण्याच्या काठीने साप मारण्याचा’ प्रकार केला जाण्याची शक्यता जास्त आहे. या आंदोलनात असे समाज कंटक लोक घुसून मराठा समाज बदनाम करण्याचे षडयंत्र तर केले जात नाही ना याची चाचपणी मराठा आंदोलनाचे ठीक ठिकाणी नेतृत्व करणाऱ्या मराठा बांधवांना करावे लागणार आहे.

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी एसटी जाळपोळ आणि एसटी फोडण्याच्या घटना घडल्यानंतर अनेक मार्गावर राज्य परिवहन महामंडळाची एसटी सेवा ठप्प केली आहे. सणासुदीच्या काळात अचानक एसटी सेवा बंद असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. यातून एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे आंदोलनाच्या मूळ उद्धिष्टाला हरताळ फासला जात आहे.

काही दिवसांपूर्वी माजलगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकी यांच्या घरावर दगडफेक करून त्यांचा बंगला, गाडी जाळण्यात आली. अनेक ठिकाणी नेत्यांच्या पोस्टर वर काळे फासन्याचे काम सुरू आहे. मराठा आंदोलनाचा फायदा घेऊन विरोधक यातून हात तर धुवून घेत नाहीत ना?

हे आंदोलन जर असेच हिंसक वळण घेत गेले तर यातून आपण आपलेच नुकसान करणार आहोत. आपल्याच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून आपण आपलीच अडचण करून घेत आहोत. यातून आपल्याच बांधवांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. यातून इतर समाजाच्या नजरेत बदनाम कोण होत आहे याचा विचार करणे गरजेचे आहे. यासाठी सर्व मराठा बांधवांनी एकत्र येत असे प्रकार रोखण्यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन करमाळा येथील मराठा बांधवांनी केले आहे.

मराठा आरक्षण तापले – करमाळा तालुक्यात एक बस जाळली तर दोन बसवर दगडफेक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!