डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या करमाळा भेटीला ८८ वर्ष पूर्ण

करमाळा(दि.२४) : २४ जानेवारी १९३७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर करमाळा शहरात आले होते. यावेळी करमाळा शहरात आंबेडकर यांची जाहीर सभा झाली होती. या ऐतिहासिक घटनेला आज ८८ वर्षे पूर्ण झाले आहेत.
‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकामध्ये करमाळ्यात कडाडले’ या शीर्षकाखाली लेखक जगदीश ओहोळ यांनी या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे.

या ऐतिहासिक घटनेविषयी लेखक जगदीश ओहोळ म्हणाले की, स्वतंत्र मजूर पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यभर सभा घेत होते त्यातीलच एक सोलापूर जिल्ह्यातील शेवटची सभा ही २५ जानेवारी १९३७ ला करमाळा येथे सभा झाली. ही सभा करून बाबासाहेब नगर जिल्ह्यात जाणार होते. सोलापूरचे उमेदवार जिवाप्पा येदाळे यांच्या प्रचारार्थ बाबासाहेब आंबेडकर हे करमाळा येथे आले होते. आंबेडकरांचे कार्यकर्ते जनार्दन कांबळे हे या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष होते. या सभेमध्ये आंबेडकरांनी स्फूर्तीदायक भाषण केले होते आपल्या भाषणात त्यांनी आपली राजकीय व्यवस्था निर्माण करा असे जनतेला सांगितले होते तसेच सोलापूरचे अधिकृत उमेदवार जिवाप्पा येदाळे यांना बहुमताने निवडून द्या असे आवाहन त्यांनी उपस्थित जनतेला केले होते. या सभेला करमाळा तालुक्यासह परिसरातून फार मोठ्या प्रमाणात जनतेने गर्दी केली होती.






