वडशिवणेतील डॉ. भगवंत पवार यांचे यूपीएससीमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश

केम(संजय जाधव) : करमाळा तालुक्यातील वडशिवणे येथील युवक डॉ. भगवंत गणेश पवार यांनी यूपीएससीद्वारे घेण्यात येणाऱ्या सीएमएस (कम्बाइंड मेडिकल सर्व्हिसेस) परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत देशपातळीवर २५ वा क्रमांक पटकावला आहे. पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवून त्यांची वैद्यकीय अधिकारी (क्लास-वन) पदासाठी निवड झाली आहे. डॉ. भगवंत पवार यांचे हे यश ग्रामीण भागातील विशेषतः मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

यूपीएससीकडून वैद्यकीय अधिकारी पदासाठी २० जुलै रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथील यूपीएससी केंद्रावर मुलाखत पार पडली. त्यानंतर २२ डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या अंतिम निकालात डॉ. भगवंत पवार यांनी घवघवीत यश नोंदवले.
डॉ.भगवंत पवार याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण वडशिवणे येथे मराठी माध्यमातून झाले आहे. गावातील प्राथमिक व माध्यमिक या दोन्ही शाळेमध्ये पहिला डॉक्टर होण्याचा मान देखील भगवंत यांना मिळाला आहे. दहावी मध्ये त्यांनी 95.20% गुण मिळवले.

अकरावी-बारावीचे शिक्षण त्यांनी सोनवणे कॉलेज, उक्कडगाव येथे पूर्ण केले. २०२० मध्ये नीट परीक्षेत ७२० पैकी ६४५ गुण मिळवत ते सोलापूर जिल्ह्यात प्रथम आले होते. त्या कामगिरीच्या जोरावर त्यांची एमबीबीएससाठी एम्स हैदराबाद येथे निवड झाली.
एम्समध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असताना त्यांनी चार गोल्ड मेडल मिळवत टॉपरची कामगिरी बजावली. एमबीबीएसनंतर एमडीसाठी घेतल्या जाणाऱ्या आयएनआय-सीईटी परीक्षेत त्यांनी देशातून ६६८ वा क्रमांक मिळवला. नुकतीच त्यांची एमडी (पेडियाट्रिक्स) साठी एम्स हैदराबाद येथे निवड झाली असून एकाच वेळी यूपीएससी-सीएमएस आणि एमडीसाठी निवड होऊन त्यांनी दुहेरी यश संपादन केले आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातून येऊन, मराठी माध्यमात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याने जिद्द, सातत्य आणि परिश्रमाच्या जोरावर देशपातळीवर यश मिळवले आहे. डॉ. भगवंत पवार यांचे यश हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल करमाळा तालुक्यासह परिसरात सर्वत्र अभिनंदन होत आहे.

