डॉ. दीपक पाटील यांना उत्तराखंड येथे राष्ट्रीय आयुष रत्न पुरस्काराने सन्मानित
करमाळा (दि.१९) – करमाळा येथील आयुर्वेद तज्ञ डॉ. दीपक सूर्यकांत पाटील यांना उत्तराखंड राज्यातील मसुरी येथे आमंत्रित करून ‘राष्ट्रीय आयुष रत्न- २०२४” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उत्तराखंड आयुर्वेद विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ.श्री. मिश्रा व कुलपती डॉ.श्री. त्रिपाठी ,आयुष मंत्रालयाचे डॉ. द्विवेदी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. तसेच याच परिषदेत डॉ. पाटील यांचे ‘आयुर्वेद-मर्म चिकित्सा’ या विषयावरील व्याख्यान देखील आयोजित करण्यात आले होते.
आयुष भारत सरकार, उत्तराखंड राज्य विभाग, उत्तराखंड आयुर्वेद विश्वविद्यालय व संजीवनी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५ वी ग्लोबल आयुष राष्ट्रीय शिखर परिषद मसूरी,उत्तराखंड येथे १४ व १५ सप्टेंबर रोजी संपन्न झाली. देश विदेशातून आयुष च्या आपापल्या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या डॉक्टराना या परिषदेसाठी निमंत्रित करण्यात येत असते. डॉ.पाटील यांच्या आयुर्वेद क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना या परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले होते.
डॉ. दीपक पाटील यांचे करमाळा येथील शाहूनगर भागात व दत्तपेठ येथे ‘श्री गजानन आयुर्वेद’ नावाने गेले अनेक वर्षांपासून क्लीनिक सुरू आहे. या पुरस्काराबद्दल करमाळा तालुक्यामधून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.