डॉ. महेंद्र नगरे यांना ‘सुरताल करमाळा भूषण’ पुरस्कार

करमाळा /संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.22: येथील सुरताल संगीत विद्यालयाच्या वतीने 24 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय सूरताल संगीत-नृत्य महोत्सव व पुरस्कार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यात डॉ. महेंद्र नगरे (करमाळा) यांना ‘सुरताल करमाळा भूषण’, पं. सुदर्शन राजोपाध्याय (नेपाळ) यांना ‘सुरताल संगीत शिरोमणी’, डॉ. दुमीथा गुनवर्धना (श्रीलंका) यांना ‘सुरताल नृत्य भूषण’, सौ. तन्नी चौधरी (कोलकाता) यांना ‘सुरताल नृत्य कलानिधी’ व सौ. बंधना बरूआ (गुवाहाटी) यांना ‘सुरताल नृत्य शिरोमणी’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
पुरस्कारांचे वितरण ग्रामविकास मंत्री व पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच सोनालीताई गोरे यांच्या हस्ते होणार असून, विकी मंगल कार्यालय येथे दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम पार पडेल.
या प्रसंगी नेपाळ, श्रीलंका, कोलकाता व गुवाहाटी येथील नामवंत कलाकार विविध कलाप्रकारांचे सादरीकरण करणार असून, रसिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी केले आहे.