नापास विद्यार्थ्यांनीही जगाचा इतिहास घडवला आहे’ – डॉ.श्रीमंत कोकाटे
करमाळा / संदेश प्रतिनिधी : जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर मार्क हवेतच पण कमी मार्क पडली तर नाराज होऊ नका कारण नापास विद्यार्थ्यांनीही जगाचा इतिहास घडवला आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध इतिहास संशोधक प्रा.डाॅ.श्रीमंत कोकाटे यांनी जेऊर (ता.करमाळा) येथे बोलताना केले.
जेऊर ता. करमाळा येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या ६४ व्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.कोकाटे बोलत होते. यावेळी उद्योगपती नारायण आमृळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यासपीठावर भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नारायण आबा पाटील, उपाध्यक्ष अनिल कुमार गादिया, हरिदास डांगे, संजयकुमार दोशी, विलास पाथरूडकर,माजी प्राचार्य हनुमंत धालगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध क्षेत्रातील गुणवत्तेचे कौतुक करून डॉ. कोकाटे म्हणाले की,भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासात एक सोनेरी पान लिहिण्याचं काम याच संस्थेत शिकलेल्या नागराज मंजुळे यांनी केले आहे.सैराट चित्रपटाचा हिरो आकाश ठोसरही याच महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. आजवर अनेक नामवंत खेळाडू, अधिकारी आणि अनेक गुणी विद्यार्थी या संस्थेने समाजाला दिलेले आहेत.
माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी आपल्या भाषणात स्नेहसंमेलनानिमित्त विद्यार्थी शिक्षकांना शुभेच्छा देऊन नव्या काळाची आव्हाने पेलण्यासाठी आवश्यक असलेली गुणवत्ता वाढ करण्यासाठी मी सदैव शिक्षकांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन यावेळी दिले. भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा.अर्जुनराव सरक यांनी संस्थेच्या प्रगतीचा अहवाल उपस्थितांसमोर ठेवला.
प्राचार्य डाॅ.अनंत शिंगाडे व प्राचार्य केशव दहीभाते यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. शिक्षकचिटणीस पाटकुलकर यांनी बक्षीसपात्र विद्यार्थ्यांच्या नावांचे वाचन केले. शिक्षक अंगद पठाडे यांनी सूत्रसंचालन केले तर मुख्याध्यापक दीपक व्यवहारे व उपप्राचार्य एन.डी कांबळे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.