शेतातील वादातून चार जणांकडून दाम्पत्यावर हल्ला - दगड-काठीनं मारहाण -

शेतातील वादातून चार जणांकडून दाम्पत्यावर हल्ला – दगड-काठीनं मारहाण

0
Oplus_0

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.९: उसतोडीच्या शेतातील वादातून उमरड (ता. करमाळा) येथे दाम्पत्यावर दगड व काठीने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत पती-पत्नी दोघेही जखमी झाले असून करमाळा पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी गुलाब बाबुलाल पठाण (वय ४५, रा. मांजरगाव, ता. करमाळा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची शेती उमरड येथे असून गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ते उसाचा ट्रॅक्टर शेजारच्या सामाईक रस्त्याने नेत होते. त्यावेळी सुमन अजिनाथ तांबे (रा. उमरड) हिने ट्रॅक्टरचा रस्ता अडविला. नंतर समजावणीने तो प्रश्न मिटला; मात्र काही वेळाने पठाण दाम्पत्य स्वतःच्या पिकअप वाहनाने गावाकडे जात असताना पुन्हा तांबे कुटुंबीयांनी रस्ता अडवून मारहाण केली.

या हल्ल्यात सुमन तांबे हिने तायर गुलाब पठाण (पत्नी) हिला दगडाने मारहाण केली, तर अजिनाथ तांबे यांनी काठीने, आणि त्यांचा मुलगा बबलु तांबे यांनी दगडाने गुलाब पठाण यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी तांबे यांची मुलगीही उपस्थित होती व तिनेही फिर्यादीच्या पत्नीला केसांनी ओढून मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटनेत गुलाब पठाण यांच्या डोक्याला तर तायर पठाण यांच्या कानामागे मार लागल्याने दोघेही जखमी झाले. त्यांना उपजिल्हा रुग्णालय, करमाळा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

भांडण सोडवण्यासाठी घटनास्थळी फिर्यादीचा चुलत भाऊ जावेद पठाण आला होता. त्याने दोघांना वेगळे केले. त्यानंतर आरोपींनी शिविगाळ करून “परत या रस्त्याने गेलात तर सोडणार नाही” अशी धमकी दिली. करमाळा पोलिस ठाण्यात सुमन तांबे, अजिनाथ तांबे, बबलु तांबे व तांबे यांची मुलगी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!