अतिवृष्टीमुळे केम परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान - पिके, फळबागा पाण्याखाली -

अतिवृष्टीमुळे केम परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान – पिके, फळबागा पाण्याखाली

0
केम येथील शेतकरी समीर तळेकर यांच्या शेतातील स्थिती

करमाळा : केम व परिसरात गेले तीन दिवस मुसळधार पाऊस झाला असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. निंभोरे, ढवळस, मलवडी, पिंपरी आदी भागांत अतिवृष्टीमुळे कांदा, मका तसेच फळबागा पाण्यात बुडाल्या आहेत.

केम येथील खोरी शिवारात झालेल्या पावसामुळे शेतकरी समीर तळेकर यांचा सोलर पॅनेल पूर्णपणे पाण्यात गेला असून तीन एकर कांद्याचे पीक जलमय झाले आहे. बेंद शिवारात कांद्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणवर नुकसान झाले आहे. पठार शिवारात ताली भरून वाहू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी मक्याच्या पिकात गुडघाभर पाणी साचले आहे. फळबागांमध्ये देखील पाणी तुंबले आहे.

ढवळस परिसर कांद्याच्या शिवारासाठी ओळखला जातो. या भागात कांदा पिकाचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये हतबलता पसरली आहे.

घरांची पडझड

दरम्यान, या पावसामुळे केम येथील रहिवासी अशोक शिंदे यांच्या घराची भिंत कोसळून दोन शेळ्यांचा मृत्यू झाला. या दोन्ही शेळ्या दुग्धजन्य उत्पादनासाठी उपयुक्त असून त्या गाभण अवस्थेत होत्या. तरी याचा पंचनामा करून भरपाई मिळावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

कालपासून कृषी अधिकारी श्री. चौधरी, तलाठी श्री. आदलिंगे व ग्रामसेवक  वैभव तळेकर यांच्याकडून शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या वेळी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.

तळेकर वस्तीवरील शेतकऱ्याची मका पाण्यात गेलेली पंचनामा करताना  तलाठी, ग्रामसेवक सोबत शेतकरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!