पार्किंगच्या नियोजन अभावाने संगोबा यात्रेतील भाविकांना सहन करावा लागला वाहतूक कोंडीचा मनस्ताप

करमाळा (दि.२६)- संगोबा यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा विचार न केल्याने वाहतुकीचे नियोजन कोलमडले. भाविकांच्या गाडी पार्किंगचे व्यवस्थितरित्या नियोजन केले नसल्याने भाविकांना मनस्ताप सहन करावा लागला. भर उन्हात अनेकांना ट्रॅफिक मध्ये अडकून रहावे लागले.
संगोबा येथे महाशिवरात्रीला फार मोठ्या प्रमाणात यात्रा भरत असते. करमाळा तालुक्यासह आसपासच्या जिल्ह्यातून भाविक यात्रेसाठी येत असतात. सकाळपासून भाविकांची दर्शन घेण्यासाठी गर्दी वाढू लागली होती. भाविक मोटारसायकल, पीक अप, ट्रॅक्टर-ट्रॉली, छोटी मालवाहतूक वाहने, खाजगी कार, महामंडळाच्या बसेसने तर काही पायी चालत आले. यात्रा प्रशासनाकडून दरवर्षीप्रमाणे वाहन तळाची सुविधा केली गेली नसल्याने वाहने लावण्यासाठी भाविकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी जागा दिसेल तिथे भाविकांनी आपली वाहने उभी केल्याने दुपारी साडे बारा पर्यंत मंदिरापासून खांबेवाडी पर्यंत वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली.
मंदिराच्या जवळपास वाहने उभी करण्यास जागा नसल्याने वाहतूक पोलीस वाहने पुढे जाऊ देत नव्हते. त्यामुळे भाविक आणि वाहतूक पोलिसात शाब्दिक चकमकी सुरू होत्या. यावेळी अनास्थेने कर्तव्यास उभे राहिलेल्या जिल्हा वाहतूक पोलिसांकडून भाविकांसह पत्रकारांनाही उर्मट भाषा वापरली जात होती. वाहतूक पोलिस आणि भाविक एकमेकांचे व्हिडिओ काढत होते आणि अशात वाहतुकीचे व्यवस्थित नियमन न केले गेल्याने भर उन्हात दुचाकी, चार चाकी, ट्रॅक्टर-ट्रॉली, रा.प. बसेस मुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली. यामुळे पायी चालणाऱ्या महिला व पुरुष भाविकांना रस्त्याच्या बाजूच्या शेतांच्या बांधावरून मार्गक्रमण करावे लागले. यावेळी तोकड्या वाहतूक बंदोबस्तामुळे सामान्य नागरिकांनाच वाहतूकीचे नियमन करावे लागले. मंदिर परिसरात देखील दर्शन रांगेचे नियोजन नसल्याने भाविकांना दर्शनासाठी तासंतास ताटकळत थांबावे लागले. आहे.





