चार दिवस पाणी न आल्याने महिलांचा करमाळा नगरपालिकेवर घागर मोर्चा
करमाळा ( संदेश प्रतिनिधी) : करमाळा शहरातील रंभापुरा भागात गेल्या चार दिवसापासून पाणी नसल्यामुळे आज (दि.११) महिलांनी आपला संताप व्यक्त करत सकाळी सात वाजता करमाळा नगरपालिकेत जाऊन बोंबाबोंब आंदोलन केले.
महिलांनी केलेल्या तक्रारीनुसार, रंभापुरा भागात केवळ एका दिवसा आड फक्त पंधरा मिनिट पाणी येते केवळ तीन ते चार हांडे पाणी भरल्यानंतर पाणी निघून जाते पाणीपुरवठा योजना खराब झाल्यामुळे महिलांचे प्रचंड हाल होत आहेत घरात काम करून मोलमजुरीसाठी शेतात जाणाऱ्या महिलांचे प्रचंड हाल होत आहेत. यावेळी पाणीपुरवठा अधिकारी कमलाकर भोज यांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र महिलांनी आश्वासन मान्य केले नाही. कारण टँकर आला की महिलांची प्रचंड भांडणे होतात व पाण्यावरून मोठे वाद होऊन पोलीस केसेस होतात यामुळे नळालाच पाणी येण्याची व्यवस्था करावी असा आग्रह धरला यावेळी तोडगा काढत आज सायंकाळी सहा वाजता उच्च दाबाने पाणी सोडण्याचे आश्वासन कमलाकर भोज यांनी दिले.
रंभापुरा शिवसेना शाखाप्रमुख निलेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या महिलांनी नगरपालिकेपुढे वार्डातील समस्या मांडल्या. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी या आंदोलनात सहभागी होऊन मुख्याधिकारी लोंढे यांनी प्रश्न तात्काळ न सोडवल्यास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी तक्रार करण्याचा इशारा दिला.
या आंदोलनात वैशाली गोळे, संगीता चव्हाण, लक्ष्मी कारंडे, सुरेखा चव्हाण, लक्ष्मी कदम, वैशाली कारंडे, छाया लोंढे, अलका कवडे, अक्का जाधव, सोनाली तांबे, आशा साळुंखे, अशोक पवार, सुनीता पवार,अलका बोलबट मेजर बोलबट, अर्जुन रमेश पवार, स्वाती कारंडे, विकी कारंडे, मीना कारंडे, शिवाजी तांबे, सार्थक चव्हाण संजय राखुंडे मीरा जाधव शोभा पवार, कीर्ती चव्हाण, आदी महिला सहभागी झाले होत्या.
इतर समस्या :
रंभापुरा भागातील गटारी प्रचंड तुंबलेले असून यामुळे रोगराई वाढली आहे. याचबरोबर या प्रभागातील शौचालयात पाणी साठवण्यासाठी तात्काळ 2000 लिटरची पाण्याची टाकी बसवण्याची मागणी केली. ही टाकी बसविण्याचे आदेश नगरपालिकेचे अधिकारी शेख यांनी दिले. मुख्याधिकारी लोंढे यांनी आज याबाबत बैठक घेऊन रंभापुरा भागातील सर्व प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले.
येणाऱ्या आठ दिवसात रंभापुरातील नागरिकांच्या आरोग्य समस्या, पाण्याच्या समस्या, स्वच्छतेच्या समस्या या सर्व समस्या सोडविल्या नाही तर करमाळा नगरपालिकेसमोर सर्व महिलांना सोबत घेऊन हलगी नाद करू.
निलेश चव्हाण, शिवसेना शाखाप्रमुख, रंभापुर, करमाळा