धायखिंडीत भीषण पाणी टंचाई – ग्रामस्थांनी टँकरची केली मागणी

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा तालुक्यातील धायखिंडी गावात सध्या प्रचंड भीषण पाणीटंचाई झाली असून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पाच किलोमीटर अंतरावरील करमाळा शहरात यावे लागत आहे. प्रशासनाने टँकरची लवकरात लवकर सोय केली नाहीतर येथील वयोवृद्धासह करमाळा तहसील कचेरी समोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा धायखिंडी शिवसेना शाखाप्रमुख बाबासाहेब भगवान तोरणे यांनी निवेदनाद्वारे तहसील कार्यालयाला दिला आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धायखिंडी हे सुमारे १२०० लोकवस्ती असलेले गाव असून हे गाव पांडे ग्रुप ग्रामपंचायत मध्ये येते. या ठिकाणी ग्रामसेवक कधीही येत नाही. गेल्या तीन महिन्यापासून पाण्याचा तुटवडा असताना ग्रामसेवकांनी याची कोणतीही माहिती गटविकास अधिकारी किंवा तहसीलदार यांना दिलेली नाही. तालुक्यात इतर ठिकाणी पाण्याची टँकर चालू झाला पण धायखिंडी येथे पाण्याचा टँकर अद्याप चालू झाला नाही. गावातील अनेक तरुण मंडळी पुणे मुंबई सारख्या ठिकाणी नोकरीला गेलेले आहेत. गावात मोठ्या प्रमाण सर्व वृद्ध मंडळी राहतात. अशा वयस्कर ग्रामस्थांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. कमी लोकसंख्येचे गाव असल्यामुळे राजकीय नेते मंडळीही नेहमीच या गावाकडे दुर्लक्ष करतात.या गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी सदर निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर सुंदरदास लांडगे,दिलीप बाळनाथ सूळ यांच्या स्वाक्षरी आहेत.



