मंडल अधिकाऱ्याच्या अनुपस्थितीमुळे शेतकऱ्याचे रस्ता खुला करण्याचे काम बारगळले

केम (संजय जाधव): शेतात रस्ता खुला करण्यासाठी पोलिस बंदोबस्त आणि जेसीबीसह महिला शेतकरी उपस्थित होत्या. मात्र, मंडल अधिकारी व तलाठी न आल्यामुळे रस्ता खुला करण्याची प्रक्रिया अपूर्ण राहिली. परिणामी, संबंधित महिलेला पुन्हा एकदा तहसीलदारांना अर्ज करून सरकारी यंत्रणेला पाचारण करावे लागणार आहे.

गुळसडी (ता. करमाळा) येथील महिला शेतकरी पद्मिनी रघुनाथ शिवतारे यांच्या स्वतःच्या गटातील शेतात जाण्यासाठीचा रस्ता काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून अडवला आहे. २०२२ पासून हा रस्ता बंद असल्याने शेताची मशागत करणे, पिकं बाजारात नेणे यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देऊन आजवर शेतकामे चालू ठेवली गेली.

रस्ता खुला करण्यासाठी जानेवारी २०२५ मध्ये करमाळा तहसीलदारांच्या न्यायालयाकडून आदेश निघाले आहेत. मात्र पोलीस बंदोबस्त न मिळणे, तारीख न मिळणे असे प्रकार सातत्याने घडत असल्याने रस्ता खुला करण्यास विलंब लागला आहे. अखेर, महिला शेतकऱ्यांनी रीतसर चलन भरून २२ जुलै २०२५ रोजी पोलीस बंदोबस्त मिळवला होता. त्यानंतर १२ जुलै रोजी त्यांनी तहसील कार्यालयात अर्ज करून मंडल अधिकारी व तलाठी यांनी त्या दिवशी उपस्थित राहावे, अशी विनंती केली होती.

या अनुषंगाने तहसीलदारांनी १८ जुलै रोजी संबंधित मंडल अधिकारी व तलाठ्यांना पत्र पाठवून, २२ जुलै रोजी गुळसडी येथे उपस्थित राहून कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. मात्र ठरलेल्या दिवशी महिला शेतकरी पोलीस बंदोबस्त आणि जेसीबीसह शेतात वाट बघत बसल्या, तरी मंडल अधिकारी वा तलाठी कोणीही आले नाहीत. यातील एका सर्कल अधिकाऱ्याने ‘‘मी कालच चार्ज सोडला’’ असे सांगितले, तर नवीन अधिकाऱ्याने चार्ज घेतला असेल तर तो का हजर झाला नाही, याचे उत्तर मिळाले नाही. त्यामुळे यामागे काही गौडबंगाल आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मंडल अधिकारी व तलाठी उपस्थित न राहिल्याने महिला शेतकरीने तहसील कार्यालयात येऊन आपला राग व्यक्त केला. त्यांना पुन्हा नव्याने अर्ज करण्यास सांगण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा पोलीस बंदोबस्त व जेसीबीची व्यवस्था महिला शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. आता तहसीलदारांच्या आदेशाचे मंडल अधिकारी व तलाठी पालन करणार का, की पुन्हा दुर्लक्ष करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
या सर्व प्रकारामुळे हतबल झालेल्या महिला शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर आठ दिवसांत रस्ता खुला झाला नाही, तर आत्मदहन करणार.

