शाळेच्या निष्काळजीपणामुळे ६ वर्षीय विद्यार्थिनीने बोट गमावले- कंदर येथील प्रकार

करमाळा(संदेश प्रतिनिधी) :कंदर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत घडलेल्या निष्काळजीपणामुळे प्रियंका सागर तांदळे (वय ६) हिचे उजव्या हाताचे बोट कापावे लागले. या गंभीर प्रकरणी वडील सागर काशिनाथ तांदळे यांनी फिर्याद दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटले की,दि. 28 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास प्रियंका शाळेच्या प्रांगणात खेळत असताना वर्गासमोर ठेवलेले पेव्हर ब्लॉक तिच्या हातावर पडले. यात तिचे बोट तुटले. एवढी गंभीर दुखापत होऊनही मुख्याध्यापिका जयश्री साळुंखे व वर्गशिक्षक बाबासाहेब शेख यांनी मुलीला रुग्णालयात न नेता शाळेतच ठेवले व केवळ रुमाल बांधून तात्पुरती सोय केली. पालकांना लगेच माहिती न देता मुलगी वेदनेने रडत राहिली.नंतर वडिलांनी तातडीने तिला टेंभुर्णी येथील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी सांगितले की, बोट जास्त वेळ लोंबकळत राहिल्याने ते वाचवता येणार नाही. परिणामी बोट कापावे लागले.

या घटनेनंतर पालकांनी करमाळा पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, गटविकास अधिकारी, जिल्हाधिकारी तसेच गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली. मात्र कोणतीही दखल घेतली त्यामुळे त्यांनी खासगी फिर्याद दिली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.



