काटेरी झुडुपे तोडत ‘दुर्गसेवक करमाळाकर’ यांची दुसरी स्वच्छता मोहीम संपन्न –
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – काल रविवारी १५ ऑक्टोबर रोजी ‘दुर्गसेवक करमाळकर’ या ग्रुपची दुसरी मोहीम करमाळा येथे पार पडली. यात भुईकोट किल्ल्याच्या तटबंदीवर उगवलेली काटेरी झुडुपे तोडण्यात आली.
करमाळा शहराला एक ऐतिहासिक वारसा असून या शहराचा इतिहास जर जपायचा असेल तर आपल्याला येथील ऐतिहासिक स्थळांना जपायला हवे हा विचार घेऊन स्थापन करण्यात आलेल्या ‘दुर्गसेवक करमाळकर’ या ग्रुपच्या वतीने या आधी ८ ऑक्टोबर ला पहिली स्वच्छता मोहीम राबविली होती. युवकांनी हातात फावडे, कोयता, कुऱ्हाड, पाट्या हातात घेऊन बुरुजावर उगवलेली छोटी-मोठी काटेरी झाडे झुडुपे तोडली. गवतावर औषध फवारणी करण्यात आली. वुडकटर मशिनच्या साहाय्याने बुरुजावर उगवलेली मोठी झाडे तोडली. फावड्याने स्वच्छता केली. अशाच प्रकारे दुसरी मोहीम १५ ऑक्टोबर रोजी परत आयोजित केली होती.
पहिल्या मोहिमेची बातमी – करमाळा भुईकोट किल्ल्यावरील स्वच्छता मोहिम उत्स्फूर्तपणे संपन्न
या मोहिमेसाठी ‘दुर्गसेवक करमाळकर’ या ग्रुपच्या सदस्यांसह करमाळा शहरातील लहानापासून मोठ्यांपर्यंत अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. यापुढे अजून वेगवेगळ्या मोहीम आखल्या जाणार आहेत. यामध्ये जास्तीत जास्त करमाळा तालुक्यातील नागरिकांनी सामील होण्याचे आवाहन ग्रुपच्या वतीने करण्यात आले.