‘न सुधरलेले’ आठ गुन्हेगार हद्दपार; करमाळा पोलिसांची कारवाई

करमाळा (दि.१७) – करमाळा तालुक्यात सतत गुन्हेगारी कृती करून जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या आठ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. महिलांवरील अत्याचार, मालमत्तेवरील हक्कभंग, शरीरविषयक गुन्हे, वाळू चोरी आणि प्राण्यांची कत्तल यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या या व्यक्तींनी कायद्याची भीती न बाळगता गुन्ह्यांची मालिका सुरूच ठेवली होती. अखेर पोलिसांनी कठोर पावले उचलत त्यांना तालुक्याबाहेर काढले आहे.
या आठ जणांविरुद्ध आधीच गुन्हे नोंदवले गेले होते आणि न्यायालयात दोषारोपपत्र देखील दाखल करण्यात आले होते. वारंवार करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईनंतरही त्यांच्यात कोणतीही सुधारणा झाली नव्हती. उलट ते पुन्हा गुन्हे करत होते, त्यामुळे परिसरात भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले होते.

हद्दपार करण्यात आलेले इसम पुढीलप्रमाणे आहेत:
1. उमेश राजेंद्र गलांडे (चिखलठाण नं.१),
2. शाहरूख आयुब कुरेशी (मौलाली माळ),
3. समाधान उर्फ दत्तात्रय लोहार (निमगाव),
4. संपत विठ्ठल मारकड (शेलगाव वांगी),
5. संतोष बिभीषण फरतडे (सातोळी),
6. करण अंबादास खरात (सिद्धार्थनगर),
7. आशपाक बाबासाहेब मुलाणी (कंदर),
8. ओंकार दादासाहेब पुजारी (देवीचा माळ) – सर्व करमाळा तालुक्यातील रहिवासी.

करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोपींना सोलापूर जिल्ह्याबाहेर सोडण्यात आले. मा. उपविभागीय दंडाधिकारी कुर्डुवाडी यांनी ६ महिने ते २ वर्षांच्या कालावधीसाठी त्यांना सोलापूर, पुणे व धाराशिव जिल्ह्यांतून हद्दपार करण्याचे आदेश दिले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी (सोलापूर ग्रामीण), अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर, उपविभागीय अधिकारी श्री. अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. करमाळा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथक आणि स्थानिक अंमलदारांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.

पोलिस प्रशासनाने सूचित केले आहे की, अशाच प्रकारे समाजात दहशत माजवणाऱ्या, बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांविरुद्ध पुढेही अशाच प्रकारची कारवाई होत राहील. करमाळा परिसरातील जनतेला भयमुक्त आणि सुरक्षित वातावरण देण्याचा प्रशासनाचा निर्धार आहे.


