किरकोळ कारणाच्या वादात वृध्द महिलेचा मृत्यू…

करमाळा (दि.११) : किरकोळ कारणाच्या वादावरून मुलगा व त्याच्या वृध्द आईस बेदम मारहाण केल्याने या झालेल्या मारहाणीत वृध्द महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बिटरगाव (वांगी), ता. करमाळा येथे घडली आहे.
या प्रकरणी शिवाजी हरिदास डोंगरे यांनी पोलीसात फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की आमच्या घराच्या समोर सिमेंटचा कोबा केल्याने सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास माझी आई त्या कोब्यावरून कोणी जावू नये म्हणून तेथे बसलेली होती. मी, माझी पत्नी उज्वला, भावजय सुरेखा आम्ही घरामध्ये होतो. त्यावेळी आई प्रभावती ही कोणाला तरी ओरडल्याचा आवाज आल्याने मी बाहेर गेलो. त्यावेळी आईने दोन मुले कोब्यावरून गेल्याने मी त्यांना या कोब्यावरून जावू नका.. असे सांगितले. त्या ठिकाणी दिनेश पांढरे, त्याची पत्नी आशा पांढरे, भावजय राणी दशरथ पांढरे व राणी हिची दोन मुले ओंकार व सत्यम् हे सर्वजण तेथे आले व त्यांनी मला दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली.

त्यावेळी माझी आई प्रभावती भांडण सोडविण्यासाठी आली असता, त्यावेळी राणी पांढरे हिने माझ्या आईच्या कानाखाली वाजवली. त्यावेळी आई खाली पडली. आता तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून वरून छातीवर जोरजोरात लाथा मारायला सुरूवात केली. त्यावेळी माझी आई खाली पडून बेशुध्द पडली. त्यावेळी मी आईकडे जाण्याचा प्रयत्न केला असता दिनेश पांढरे याने मला पकडून ठेवले. त्यानंतर गावातील विठ्ठल कल्याण चोपडे व अमोल पंढरीनाथ पवार हे तेथे आले व त्यांनी भांडण सोडविले. त्यानंतर माझ्या आईस उठविण्याचा प्रयत्न केला परंतु तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिला तातडीने गाडीत घेऊन कुटीर रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच माझ्या आईस मृत घोषित केले. या प्रकरणी करमाळा पोलीसांनी दिनेश दत्तात्रय पांढरे, आशा दिनेश पांढरे, राणी दशरथ पांढरे, ओंकार दशरथ पांढरे, सत्यम दशरथ पांढरे (सर्व रा. बिटरगाव वांगी) यांचे विरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.





