राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोलापूर जिल्हाध्यक्षपदी अभिषेक आव्हाड यांची निवड
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी करमाळा शहरातील राष्ट्रवादीचे अभिषेक आव्हाड यांची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे आणि युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली आहे.
अभिषेक आव्हाड यांची सुरवात करमाळा शहर सचिव म्हणून झाली. नंतर सलग 3 वेळेस करमाळा शहराध्यक्ष, सोलापूर वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष तसेच निरीक्षक, आणि आता सोलापूर जिल्हाध्यक्ष पद हे त्यांना पक्षाने कामाची दखल घेऊन दिले आहे. करमाळ्यासारख्या ग्रामीण भागातून सर्वसामान्य कुटुंबातील युवकाला सोलापूर जिल्हा अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी अभिषेक आव्हाड यांना मिळाल्यामुळे करमाळा तालुक्यातील युवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे.
प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम केल्यावर त्याचे फळ नक्की मिळते यावर आपला विश्वास असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व सर्व नेत्यांच्या विश्वासाला सार्थ ठरवुन पार पाडणार असल्याचे अभिषेक आव्हाड यांनी सांगितले. अभिषेक आव्हाड यांच्या निवडीवेळी आमदार संजयमामा शिंदे, प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, दीपकआबा साळुंखे पाटील आणि जिल्ह्यातील वरिष्ठ नेते उपस्थित होते.