‘मकाई’ कारखान्याच्या चेअरमन व व्हा.चेअरमन पदाची निवडणूक ८ जुलैला – चेअरमन कोण ? याकडे सर्वांचे लक्ष..
करमाळा : श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन व व्हा.चेअरमन पदाची निवडणूक ८ जुलैला कारखाना कार्यस्थळावर सकाळी अकरा वाजता होणार आहे. या निवडणुकीच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी सोपान टोंपे हे राहणार आहेत.
मकाई सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच संपन्न झाली असून या निवडणुकीत बागल गटाने एकहाती सत्ता मिळवली आहे. असे असलेतरी बागल गटाचे नेते व माजी चेअरमन दिग्विजय बागल तसेच रश्मी बागल हे दोघेही संचालक मंडळात नाहीत, त्यामुळे या निवडणुकीत चेअरमनपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. कारखान्याच्या कामातील अनुभवाचा विचार केलातर ज्येष्ठ नेते बाळासाहेब पांढरे व आदिनाथचे माजी संचालक राहिलेले दिनेश भांडवलकर या दोघांपैकी एकाचा चेअरमन पदासाठी विचार होऊ शकतो. दरम्यान बागल गटाचे नेते दिग्विजय बागल व रश्मी बागल यांनी आज ७ जुलै शुक्रवारी बागल संपर्क कार्यालयात संचालकांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत
चेअरमन, व्हा.चेअरमन पदाबाबत विचार विनिमय होऊन शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे किंवा शेवटपर्यंत नाव गुप्त ठेवून शेवटचे दिवशीच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत संचालकांशी चर्चा केली असता, नेतेमंडळी जो निर्णय घेतील तो आम्हास मान्य आहे. यावरून चेअरमन पदा बाबत नेतेमंडळींनी सस्पेंस कायम ठेवला आहे. सध्याच्या संचालकात बाळासाहेब पांढरे, रामचंद्र हाके, संतोष पाटील हे तीन संचालक मागील बोर्डातील संचालक आहेत. बाकी सर्व नवीन चेहरे आहेत. त्यामुळे या सर्व संचालकांपैकी मलाच संधी मिळावी, असा दावा कोणत्याही संचालकांनी केलेला नाही व तशी फिल्डींगही लावलेली नाही. बाळासाहेब पांढरे हे सर्वात जुने, अनुभवी व बागल समर्थक संचालक आहे. ज्येष्ठतेचा व अनुभवाचा विचार केला तर त्यांना चेअरमन पदाची संधी मिळू शकते.
दुसरे मांगी गटातील जवळचे व अनुभवी संचालक दिनेश भांडवलकर यांचाही विचार होऊ शकतो. याशिवाय आशिष गायकवाड, सतीश नीळ, अमित झांजुर्णे, मांजरगावचे जुने संचालक संतोष पाटील, अमोल यादव, नवनाथ बागल, बापूराव चोरमले यांना व्हा.चेअरमन पदाची संधी मिळू शकते. महिलांना प्राधान्य द्यायचा विचार – झाला तर अश्विनी झोळ किंवा कोमल करगळ यांना व्हा. चेअमरन पदाची संधी मिळू शकते. विशेष म्हणजे चेअरमन व व्हा. चेअरमन पदासाठी संचालकात कोणतीही स्पर्धा नसल्याने नेतेमंडळींवरच सर्व अवलंबून असल्याने या विषयाची उत्सुकता लागून राहिली आहे.