जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेत
सौ.माधुरी परदेशी व ॲड.शशिकांत नरुटे यांची निवड

करमाळा, ता.५: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुरवठा शाखेच्या वतीने जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद गठित करण्यात आली असून या समितीवर करमाळा तालुक्यातील सौ. माधुरी राजेंद्र परदेशी व ॲड. प्रा. शशिकांत नरुटे यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

ग्राहकांचे हक्क, संरक्षण व जनजागृती यासाठी कार्य करणाऱ्या या महत्त्वाच्या परिषदेत एकूण ४२ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष म्हणून कार्यरत असून जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्राहक संघटना, शाळा-महाविद्यालये, वैद्यकीय व्यावसायिक संस्था, व्यापारी व उद्योग संघटना, तसेच पेट्रोल-गॅस विक्रेते व शेतकरी प्रतिनिधी यांचा समावेश आहे. प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम (भा.प्र.से.) यांच्या सहीने याबाबतचे अधिकृत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

सदर अशासकीय सदस्यांचा कार्यकाळ तीन वर्षे किंवा नवीन सदस्य नियुक्त होईपर्यंत राहणार आहे. या निवडीबद्दल अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष बाळासाहेब औटी, प्रांत सहसचिव दीपक इरकल व सोलापूर जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी अभिनंदन केले आहे.
ग्राहक हिताच्या लढ्यात करमाळ्याचा सक्षम आवाज या माध्यमातून अधिक प्रभावीपणे मांडला जाणार असल्याचा विश्वास नुतन सदस्यांनी व्यक्त केला आहे.


