आचार संहितेपूर्वी रिटेवाडी उपसासिंचन योजना मार्गी न लागल्यास येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार घालणार – शेतकऱ्यांचा एल्गार
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीच्या वतीने काल (दि.१६ फेब्रुवारी) शुक्रवारी सकाळी वीट येथे करमाळा पुणे रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये लाभ क्षेत्रातील चाळीस गावातील मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते यावेळी चाळीस गावातील सरपंच, उपसरपंच व शेतकरी बांधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित सर्व शेतकरी बांधवांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जर रिटेवाडी उपसा सिंचन योजना मंजूर नाही झाली तर उपस्थित सर्व चाळीस गावातील शेतकरी बांधव येणाऱ्या लोकसभा तसेच विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकांवर शंभर टक्के बहिष्कार घालणार आहेत असा इशारा यावेळी दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुकडी धरण ते करमाळा २५० किलोमीटरचे अंतर असल्यामुळे पुर्ण दाबाने पाणी कधीच भेटत नाही आत्तापर्यंत आमच्या शेतात पाण्याचा एक थेंबही आलेला नाही. त्याच्यामुळे आम्ही शेतकरी सतत हाल अपेष्टाचे जीवन जगत आहोत, तसेच सततच्या दुष्काळामध्ये होरपळत आहोत. आमच्या करमाळा तालुक्याची हेळसांड झालेले आहे. त्यामुळे आमच्या करमाळा तालुक्याला असणारे हक्काचे ६ टीमसी पाणी उजनी धरणात सोडून आम्हाला रिटेवाडी उपसा सिंचन करुन आमचे हक्काचे पाणी मिळवून द्यावे ही आमची ३५ ते ४० गावची प्रमुख मागणी आहे.
यावेळी माजी सरपंच शहाजीमाने, वीट सरपंच महेश गणगे, रावगाव सरपंच संदीप शेळके, अंजनडोह सरपंच अरुण शेळके, राजूरी सरपंच शेळके, विहाळ सरपंच मारकड, वंजारवाडी सरपंच प्रवीण बिनवडे, पोथरेचे सरपंच अंकुश शिंदे, कामोने सरपंच नलावडे झरेचे प्रशांत पाटील रामदास झोळ, अर्जुन गाडे, अंगद देवकते, बाळासाहेब टकले, अण्णासाहेब सुपनवर, गोरख ढेरे अभयसिंहराजे भोसले, उदय ढेरे, बलदोटा काका, प्रशांत शिंदे तसेच विविध गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या वर्षी करमाळा तालुक्यामध्ये श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पुजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित झाले होते. यावेळी रिटेवाडी उपसा सिंचन करून देणार हे आश्वासन त्यांनी दिले होते. ते आश्वासन पाळावे असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी उपस्थित सर्व सरपंच पदाधिकारी व शेतकरी यांच्यावतीने देण्यात आलेले निवेदन मंडल अधिकारी श्री बागवान यांनी स्वीकारले. यावेळी पोलीस अधिकारी श्री.टिळेकर, अझर शेख, श्री. दळवी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
कुकडी लाभक्षेत्रात करमाळा तालुक्यातील पुढील गावे येतात – अंजनडोह वीट, विहाळ झरे कोर्टी रावगाव पोंदवडी, लिंबेवाडी, वंजारवाडी, मोरवड, पिंपळवाडी हिवरवाडी, रोसेवाडी, राजुरी, भोसे, वडगाव दक्षिण, उत्तर, पुनवर पोथरे, निलज, कामोणे, खडकी, जातेगाव, मांगी, आळजापूर, सावडी, कुंभारगाव तसेच त्याखालील येणाऱ्या संपूर्ण वाड्या असे मिळून ३५ ते ४० गावे कुकडी लाभक्षेत्रामध्ये आहेत.