प्रदीर्घ सेवेनंतर करमाळा एसटी आगारातील विविध पदावर काम करणारे ४ कर्मचारी सेवानिवृत्त
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा एसटी आगारामध्ये विविध पदावर कार्यरत असणारे चार कर्मचारी आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर १५ जून रोजी सेवानिवृत्त झाले. यामध्ये वाहतूक नियंत्रक शंकर बदर, वरीष्ठ लिपिक अरुण घोलप, चालक ईश्वर सावंत, हेड मेकॅनिक बाबासाहेब सपकाळ यांचा समावेश आहे. सेवानिवृत्तीनिमित्त या चौघांचा करमाळा एसटी आगाराकडून सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभावेळी करमाळा आगार व्यवस्थापक वीरेंद्र होनराव, कामगार संघटनेचे श्रीकांत गोमे ,सचिन माने ,कामगार नेते धनंजय सावंत, सोसा.माजी संचालक नारायण रेगुडे, चेअरमन भरत नलवडे ,नाना नलवडे आदिजण उपस्थित होते.
सदर सत्कार समारंभात सेवानिवृत्त होत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आपापले नोकरीतील अनुभव उपस्थितांसमोर व्यक्त केले. याचबरोबर उपस्थित इतर एसटी कर्मचाऱ्यांनी चौघांना सेवानिवृत्तीनंतरच्या पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
वरीष्ठ लिपिक म्हणून सेवानिवृत्त झालेले अरुण घोलप यांनी १९८८ साली करमाळा एसटी आगारा मध्ये लिपिक म्हणून कामास सुरुवात केली. त्यांनी ३६ वर्ष अखंडितपणे करमाळा एसटी आगराची सेवा बजावली. वाहतूक नियंत्रक शंकर बदर यांनी सुमारे ३८ वर्ष अखंडपणे तर हेड मेकॅनिक बाबासाहेब सपकाळ यांनी ३६ वर्षे अखंडपणे सेवा बजावली आहे.
ईश्वर सावंत यांनी १९९९ साली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये चालक म्हणून रुजू झाले होते. त्यांनी प्रथम बारामती आगार येथे चालक म्हणून सेवेची सुरुवात करत नंतर कोल्हापूर व त्यानंतर करमाळा आगार मध्ये चालक म्हणून सेवा केली. गेले पंचवीस वर्षे त्यांनी विना अपघात सेवा करत आदर्श चालकाचा सन्मान मिळवला आहे.