बागल गटाचा ‘भाजपा’त प्रवेश – रश्मी बागल यांची महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल-कोलते व बागल गटाचे युवा नेते दिग्विजय बागल तसेच कार्यकर्त्यांनी आज (ता.27) मुंबई येथील ‘भाजपा’च्या प्रदेश कार्यालयात हजर राहुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच ‘भाजपा’च्या अनेक नेत्यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे,

बागल गटाचा भाजपा प्रवेशानंतर बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांची भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, ही निवड भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज (ता.27) सायंकाळी मुंबई येथे रश्मी बागल यांना या नियुक्तीचे पत्र दिले आहे.

निवडीनंतर बोलताना रश्मी बागल यांनी म्हटले की, भारतीय जनता पार्टी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना अपेक्षित असलेले भाजपाचे संघटनात्मक कार्य अधिक भक्कम व मजबूत करण्याकरिता प्रदेश महिला मोर्चाच्या माध्यमातून जास्तीत जास्त वेळ देवून चांगल्याप्रकारे काम करु तसेच दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडणार असल्याचे रश्मी बागल यांनी म्हटले आहे.

बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल-कोलते व बागल गटाचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी आज (ता.27) करमाळा तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांसह मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी बागल गटासह काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री बसवराज पाटील यांनी देखील याचवेळी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार सावंत उपस्थित होते.

या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप, मकाई कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर, आदिनाथ कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे, विद्या विकास शिक्षण मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, मकाईचे संचालक अमोल यादव, मार्केट कमिटीचे संचालक काशिनाथ काकडे, मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक सतीश निळ, आदिनाथ कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन नानासाहेब लोकरे, मकाईचे संचालक आशिष गायकवाड, मकाईचे संचालक अनिल अनारसे, कलीम काजी, आनंदराव कांबळे, ॲड. नानासाहेब शिंदे तसेच विकास भोसले यांनी देखील उपस्थित राहून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.

यावेळी रश्मी बागल यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना, करमाळा तालुक्यातील रिटेवाडी उपसासिंचन योजना राबविण्यात यावी यासाठी विशेष लक्ष द्यावे अशी चिठ्ठी देत मागणी केली. यावर फडणवीस यांनी आपल्या भाषणात या योजनेतील अडचणी दूर करून ही योजना साकारण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!