करमाळ्यात ‘तालुका मानवाधिकार संरक्षण समिती’ स्थापन – गावागावात उभारणार संघटना…

करमाळा/संदेश प्रतिनिधी : देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे उलटली, तरीही अनेक ग्रामीण भागात 50 टक्क्यांहून अधिक लोकांना दडपशाही, अन्याय, आणि पारतंत्र्यात जीवन जगावं लागत आहे. आपल्या समस्या शासनाच्या दारापर्यंत मांडताना अनेकांना अडथळे, दबाव, आणि त्रास सहन करावा लागतो. हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्यांना मदत करणारी, मार्गदर्शन करणारी आणि न्याय मिळवून देणारी संघटना उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यात तालुका मानवाधिकार संरक्षण समितीची स्थापना करण्यात आली असून, ती राजकारणविरहित राहील आणि अन्यायग्रस्तांच्या बाजूने ठाम उभी राहील.
अहमदनगर हायवे रस्त्यालगत असलेल्या”संदेश कृषी पर्यटन केंद्र” येथे सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत गाव पातळीपासून तालुका पातळीवर सामान्य माणसांना भेडसावणाऱ्या समस्या, त्या सोडवण्यासाठी आवश्यक यंत्रणा, तसेच लोकशाहीत मानवी हक्कांचे महत्त्व यावर सविस्तर चर्चा झाली.

यावेळी समितीने महत्त्वाची उद्दिष्टे ठरवली आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय मानव अधिकार आयोग व महाराष्ट्र मानवाधिकार आयोग यांच्या मार्गदर्शनानुसार हे कार्य राहणार, अन्यायग्रस्तांना शासन दरबारी न्याय मिळवून देणे, आर्थिक, सामाजिक व कायदेशीर अडचणीत असलेल्या व्यक्तींना सल्ला व मदत उपलब्ध करून देणे, प्रत्येक गावात समिती उभारून हक्कांसाठी सजग नागरिकांचा गट तयार करणे, राजकारणविरहित, शुद्ध वैचारिक पातळीवर संघर्ष उभा करणेचे ठरले आहे.
यावेळी तालुकापातळीवर समिती स्थापन करण्याचा व भोसे येथे 15 ऑगस्ट च्या ग्रामसभेत ग्राम मानवाधिकार संरक्षण समिती स्थापन करण्याचा ठराव करण्याचे ठरले आहे. ज्यांना तालुक्यात राजकारणविरहित या समितीमध्ये काम करायचे त्यांनी ॲड. बाबुराव हिरडे – 9011355389, गजेंद्र पोळ – 9960471266, अनिल माने – 9881264373 यांच्यांशी संपर्क करावा असेही ठरले आहे.

अन्याय सहन करायचा नाही, आणि अन्याय करणाऱ्याला मोकाट सोडायचे नाही.लोकशाही म्हणजे फक्त मतदान नव्हे, तर प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. हा हक्क मिळवण्यासाठी तालुकापातळीवर डॉ. ॲड.बाबूराव हिरडे यांच्या नेतृत्वाखाली तालुका मानवाधिकार संरक्षण समिती स्थापन करत आहोत.त्याबरोबरच प्रत्येक गावात अशी समिती स्थापन करून हे काम केले जाईल.
प्रमोद झिंजाडे ,अध्यक्ष-महात्मा फुले समाज मंडळ, पोथरे.
या बैठकीला प्रमोद झिंजाडे ,डॉ.ॲड.बाबूराव हिरडे ,जेष्ठ कवी प्रकाश लावंड, निवृत्त मुख्याध्यापक व भोसे सरपंच प्रतिनिधी निवृत्ती सुरवसे,पत्रकार गजेंद्र पोळ, सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर,मेजर बबन नलवडे, निवृत्त मुख्याध्यापक दादासाहेब झिंजाडे, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन तकिक, मोरेश्वर अण्णा पवार, नितीन तकिक, ॲड. बिभीषण सोरटे,अंगद देवकते,महादेव झिंजाडे, हनुमंत वारे (उपसरपंच भोसे), ॲड. प्रियाल अग्रवाल, अंधश्रद्धा निर्मूलनचे अध्यक्ष दिगंबर साळुंखे, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल माने, मार्गदर्शक रामचंद्र बोधे गुरूजी, तसेच डी.के. पासंगराव,नानासाहेब साळुंके,बाळासाहेब दुधे, कवी खलील शेख, इब्राहिम शेख, संतोष कांबळे, ग्राहक पंचायतचे संजय हांडे ,भावेश देवी,योगेश गिरमकर, यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

