जेऊर बसस्थानकाचे नूतनीकरण होणार – दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर : माजी आमदार नारायण पाटील
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : जेऊर (ता.करमाळा) येथील बसस्थानकाचे नूतनीकरण होणार असून, दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी आमदार नारायण पाटील यांनी दिली.
याबाबत माहिती देताना श्री.पाटील यांनी सांगितले की, जेऊर व परिसरातील वीस गावांच्या दळणवळणासाठी महत्वाचे असलेले जेऊर बसस्थानक हे गेली अनेक वर्षापासून भौतिक सुविधांपासून वंचित होते. यामुळे या बसस्थानकाचे नुतणीकरण करावे अशी आग्रही मागणी आपण शासनाकडे केली व अखेर या मागणीस यश आले असून नुतणीकरण कामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे.
या कामास प्रशासकीय मंजुरी मिळाली असून राज्य परिवाहनचे पुणे प्रदेश कार्यकारी अभियंता यांचेकडून पुणे येथील अरिन डिजाइन यांना सदर कामाचे नकाशे तयार करणेबाबतचे पत्र (जाक्र।राप।काअपु।रेशा।1427) देण्यात आले आहे.आता नुतणीकरण काम लवकरच हाती घेण्यात येणार असून यात तळमजला (300 चौ.मी) व पहिला मजला बांधकाम,पाणी पुरवठा व सांडपाणी व्यवस्था,विद्युतकाम,फायर फायटींग,पेव्हर ब्लाक पार्कींग,कुंपण भींत व गेट आदि कामांचा समावेश आहे.लवकरच हे काम पुर्ण व्हावे यासाठी आपला पाठपुरावा चालू राहणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.
करमाळा,कुर्डुवाडी व जेऊर बसस्थानकाचे नुतणीकरण करणार असे माजी आमदार नारायण पाटील यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुक जाहिरनाम्यातुन जनतेस सांगितले होते, त्यानुसार जेऊर बसस्थानकाचे काम पुर्ण होणार आहे, असे पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले.