करमाळा (ता.१): गेल्या महिनाभरात चिलींग च्या नावाखाली केळी मातीमोल भावाने घेऊन केळी उत्पादक शेतकऱ्यांची अक्षरशः लुट केली आहे. आता केळीचे रोप विक्री करताना एजंटाकडून अव्वाच्या सव्वा भाव लावून व नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना रोपे न देता जादा भाव देणाऱ्यांना रोपे देवून फसवणूक केली जात आहे.
गेल्या दोन वर्षापासून केळीला चांगले बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी केळीची लागवड मोठ्या प्रमाणात करत आहेत. केळीची टीश्यु रोपे बनवणाऱ्या कंपनी रोपांची विक्री एजंट मार्फत करत आहेत. रोपांची वाढती मागणी लक्षात घेऊन एजंट रोपांचे ब्लॅकमेल करत आहेत. जे शेतकरी जादा पैसे देतील त्यांनाच चढ्या भावाने रोपे दिली जातात. ज्यांनी बुकींग केले आहे, त्या शेतकऱ्यांना टाळले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची रोपापासून ते विक्री पर्यंत फसवणूक केली जात आहे. शासनाने याकडे लक्ष देवून शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
शेतकरी शेतीतून दोन पैसे मिळतील या अपेक्षेने केळी लागवडीकडे आकर्षीत होत आहे. त्याचा गैरफायदा एजंट व व्यापारी घेत आहेत. एजंटाकडे बुकिंग करुनही केळी रोपे नोंदलेल्या भावात शेतकऱ्यांना न देता ऐनवेळी जादा भाव देणाऱ्यांना दिली जात आहेत. 15 रुपयाचे रोप 25 ते 28 रुपयांपर्यंत चढ्या भावाने विकले जात आहे. त्यामुळे अक्षरश: लुटले जात आहे. मध्यंतरी चिलींग च्या नावाखाली 20 ते 22 रूपये दराची केळी 7 ते 8 रूपये दरांनी घेऊन शेतकऱ्याला कंगाल केले आहे. अशा स्थितीत शासनाने केळी रोप विक्रेते व व्यापारी यांच्यासाठी योग्य ते नियम करावेत व त्याची कडक अंमलबजावणी करावी.