घोटी जिल्हा परिषद शाळेत उपशिक्षिका सुषमा कोरे यांना सेवापूर्तीनिमित्त मानाचा निरोप

0

केम(संजय जाधव): करमाळा तालुक्यातील घोटी येथील जिल्हा परिषद शाळेतील उपशिक्षिका सुषमा प्रकाश कोरे यांचा सेवापूर्ती सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकवृंद यांच्या वतीने करण्यात आले होते.



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच विलासकाका पाटील उपस्थित होते. सुरुवातीला दीपप्रज्वलन करून पुष्पगुच्छ देत सौ. कोरे यांचा सत्कार करण्यात आला. सहकाऱ्यांनी त्यांच्या ३० वर्षांच्या सेवाकाळातील कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. विद्यार्थ्यांप्रती असलेली माया, शिस्तप्रियता आणि अध्यापनातील नवनवीन प्रयोग यांचा विशेष उल्लेख यावेळी करण्यात आला.

मान्यवरांनी आपल्या मनोगतांतून सौ. कोरे यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी गीत, कविता आणि आठवणी सादर करून आपल्या आवडत्या शिक्षिकेला भावनिक निरोप दिला.

उत्तरादाखल बोलताना सौ. कोरे यांनी आपल्या सेवाकाळातील अनुभव कथन करत सहकाऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे आभार मानले. “शिक्षक हा केवळ ज्ञानदाता नसून संस्कारांचा शिल्पकार असतो,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.

कार्यक्रमाच्या शेवटी स्मृतिचिन्ह व शाल–श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी केंद्रप्रमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य, मुख्याध्यापक, सरपंच तसेच सामाजिक कार्यकर्ते व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन रंदवे गुरूजी यांनी केले तर आभारप्रदर्शन मुख्याध्यापक विजय लोंढे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!