चेअरमनच्या आश्वासनावर शेतकऱ्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

केम(संजय जाधव): भोसे (ता. पंढरपूर) येथील कृषिराज गुळ पावडर कारखान्याकडून तब्बल 33 महिन्यांपासून शेतकऱ्यांची ऊस बिले थकित असून, सुमारे अडीच कोटी रुपयांची रक्कम थकली आहे.
येत्या 15 सप्टेंबर 2025 पर्यंत पैसे न दिल्यास कारखान्याचे चेअरमन गणेश पाटील यांच्या घरासमोर उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी यापूर्वी कंदर (ता. करमाळा) येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला होता. मुदत संपल्यानंतरही पैसे न मिळाल्याने रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुहास पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 15 सप्टेंबर रोजी पाटील यांच्या घरासमोर आंदोलन केले. यावेळी शेतकरी आक्रमक झाले होते.

या आंदोलन स्थळी चेअरमन गणेश पाटील आले व त्यांनी आपली भूमिका यावेळी मांडली. आर्थिक अडचण आल्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे वेळेत देता न आल्याचे ते म्हणाले तसेच मला कुणाचेही पैसे बुडविण्याचे नाहीत; मला आता लोन उपलब्ध झाले असून, लवकरच 20 सप्टेंबरपर्यंत सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत बिले अदा केली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. यानंतर आंदोलक शेतकऱ्यांनी सुरु असलेले आंदोलन तात्पुरते स्थगित केले.

काय आहे प्रकरण?
करमाळा तालुक्यातील केम, सातोली, पांगरे, वांगी, कंदर भागातील शेतकऱ्यांनी 2022-23 हंगामात भोसे येथील कारखान्यास ऊस पुरवठा केला होता. मात्र आजवर त्यांना पैसे मिळालेले नाहीत. सुमारे अडीच कोटी रक्कम थकली आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध पातळ्यांवर पाठपुरावा केला.

चेअरमन गणेश पाटील यांनी सुरुवातीला 1 सप्टेंबरपर्यंत बिले देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर 15 सप्टेंबरपर्यंतची नवीन मुदत दिली. पण वारंवार आश्वासने देऊनही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. शिवाय अनेक शेतकऱ्यांना दिलेले धनादेश निधीअभावी परत आल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे चेअरमनच्या घरासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.


