सातबारावरील तलाठ्यांच्या चुकांमुळे शेतकऱ्यांची फरफट -

सातबारावरील तलाठ्यांच्या चुकांमुळे शेतकऱ्यांची फरफट

0

करमाळा (दि.१६) –  सातबारा उताऱ्यावर वारंवार होणाऱ्या त्रुटींमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल सुरू आहेत. नाव, वडिलांचे नाव, गट नंबर, क्षेत्रफळ अशा महत्वाच्या बाबतीत तलाठ्यांकडून होणाऱ्या चुका शेतकऱ्यांच्या विविध योजनांवरील लाभांपासून वंचित राहण्यास कारणीभूत ठरत आहेत.

या त्रुटीमुळे पीएम किसान योजना, पीककर्ज, पिकविमा आदी लाभ मिळत नाहीत. काही प्रकरणांमध्ये सातबारा उताऱ्यावर नाव नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांचे विवाहही रखडल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

या पार्श्वभूमीवर नेरले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक श्री औदुंबर राजे भोसले यांनी तलाठ्यांच्या या हलगर्जीपणाविरोधात आवाज उठवला आहे. त्यांनी तहसील कार्यालयात लेखी निवेदन सादर करत चूक करणाऱ्या तलाठ्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.

भोसले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  “तलाठ्यांकडून झालेल्या चुकांनंतर त्याची दुरुस्ती करण्यासाठी तहसीलदारांचा आदेश आवश्यक असतो. त्यासाठी शेतकऱ्यांना मंडळाधिकारी चौकशी, अहवाल, तहसील कार्यालयाचे फेरे अशा अनेक टप्प्यांतून जावे लागते. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण व्हायला ६ महिने ते १ वर्ष लागतो. काही प्रकरणात २० वर्षांपासून, १४ वर्षांपासून अर्ज प्रलंबित आहेत.  तलाठ्याच्या चुकीसाठी शेतकऱ्याला इतका त्रास का?” “चूक करतो तलाठी, शिक्षा मात्र शेतकऱ्याला – हे अन्यायकारक आहे”

औदुंबरराजे भोसले

तलाठ्यांवर कारवाई, भरपाईची मागणी

“ज्याच्या चुकीमुळे शेतकरी हैराण झाला, त्या तलाठ्याला तात्काळ निलंबित करावे आणि संबंधित शेतकऱ्याला त्रासाची भरपाई द्यावी,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

नियम बदल न झाल्यास संघर्षाचा इशारा

“जोपर्यंत हे अन्यायकारक नियम बदलले जात नाहीत, तोपर्यंत आम्ही संघर्ष करू. हे सामान्य माणसाच्या हक्काचं लढा आहे,” असा इशाराही भोसले यांनी प्रशासनाला दिला. शेवटी, राज्यभरातील शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!