मकाईचे ऊस बिल बँकेमार्फत मिळण्यास उशीर – शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : श्री मकाई सहकारी साखर कारकान्याच्या गेल्या वर्षीच्या गळीत हंगामाची ऊस बिलाची प्रतिक्षा संपली असलीतरी प्रत्यक्षात मात्र बँके मार्फत बिले मिळण्यास उशीर होत असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. बँकेत हेलपाटे घालून शेतकरी हैराण झाले आहेत.
श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या ऊस बिलासाठी गेल्या दीड वर्षापासून संघर्ष चालू आहे. यासाठी अनेक आंदोलने झाली, वादावादी झाली. शेवटी निवडणूक कालावधीत बागल गटाला पैसे मिळविण्यात यश मिळाले. कारखान्याने संबंधित बँकेमध्ये याद्या पाठविल्या आहेत. पण गेल्या चार-पाच दिवसापासून काही बँकेचा अपवाद वगळता अनेक बँकातून शेतकऱ्यांचे पैसे मिळण्यास विलंब होत आहेत.
शेतकऱ्यांनी विचारणा केली असता, अपुरा कर्मचारी स्टाफमुळे विलंब होत असल्याचे सांगितले जात आहेत. पंढरपूर अर्बन बँकेतून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जात आहे. परंतु तेथे चौकशी केली असता, दोन-तीन दिवसात पैसे जमा होतील; असे सांगितले जात आहे. कारखाना प्रशासनाने बँकेला सूचना करून तात्काळ बीले सोडावीत; अशी शेतकरी मागणी करीत आहेत.