मकाई कारखान्याच्या ऊसाची बीले जमा होण्यास सुरूवात – शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे ऊस बील जमा होण्यास सुरूवात झाल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
श्री मकाई कारखान्याचे आर्थिक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची ऊसाची बिले प्रलंबित होती. बिले मिळण्यासाठी अनेक आंदोलने झाली. बागल गटाच्या नेत्यारश्मी बागल व माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी शेतकऱ्यांना वेळेत पैसे मिळण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. परंतु काही तांत्रिक बाबी व तक्रारींचा पाढा यामुळे कर्ज प्रकरणे होण्यास उशीर झाला.
गेल्या चार-पाच दिवसांपासून कारखान्याला आर्थिक मदत मिळाली असून, शेतकऱ्यांचे खात्यावर पैसे जाण्यास सुरूवात झाली आहे. पहिले दोन दिवस बँकेतून अपुरा कर्मचारी स्टाफ यामुळे पैसे मिळण्यास विलंब होत होता. शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्यानंतर कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी पंढरपूर बँकेचे चेअरमन आमदार प्रशांत परिचारक यांना तात्काळ बिले पाठविण्याची विनंती केली. त्यानंतर ३ मे पासून शेतकऱ्यांची बिले जादा गतीने जमा होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.


