शेतकऱ्यांनी ‘आदिनाथ’ला ऊस देऊन सहकारी संस्था बळकट करावी – माजी आमदार नारायण पाटील..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ‘आदिनाथ’ला ऊस देऊन सहकारी संस्था बळकट करावी असे आवाहन माजी आमदार नारायण पाटील यांनी केले आहे.
याबाबत सविस्तर बोलताना पाटील म्हणाले की, आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा तालुक्यातील 32 हजार शेतकऱ्यांच्या मालकी हक्काचा कारखाना आहे. आदिनाथ कारखान्यावर आलेले भाडेपट्टीचे गंडांतर आता नष्ट झाले असून कर्जाचा डोंगर आता उरला नाही. सर्वांच्या साथीमुळे आदिनाथचा चालू गळीत हंगाम आता सुरु झाला असून, सभासद ऊस गाळपास देऊ लागले आहेत. पुर्व हंगामी कर्जाची वाट न पाहता सभासदांच्या विश्वासाच्या जोरावर कारखाना सुरु केला असल्याने कारखाना सुरु करताना अनंत अडचणी आल्या परंतू या सर्व अडचणींवर मात करत आदिनाथ कारखाना उभारी घेत आहे.
सध्या साखर, मोलॅसिस, बगॅस उत्पादन होऊ लागले आहे. गाळपाची प्रक्रिया निरंतरपणे हंगाम संपे पर्यंत चालू राहील्यास गाळप केलेल्या ऊसास चांगला भाव निश्चितच दिला जाणार असून शेतकऱ्यांनी आता त्याची चिंता करु नये. आज जरी संस्था अडचणीत दिसत असली तरी उभारी घेण्यास वेळ लागणार नाही. आता केवळ सभासदांचे सहकार्य व ऊस घालण्याची सकारात्मक भुमिका आदिनाथला परत एकदा सुवर्णकाळ मिळवून देतील. करमाळा तालुक्यातील सहकारी संस्था वाचल्या पाहिजते याचा अभिमान बाळगून प्रत्येक्ष कृतीतून सभासदांनी आपले कर्तव्य पार पाडावे.
आगामीकाळात आदिनाथवर डिस्टलरी, इथेनाॅल व वीज निर्मिती सारखे बायप्राॅडक्ट प्रकल्प कार्यरत करुन ऊस दराच्या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्वाधिक ऊस देणारा कारखाना म्हणून आदिनाथ अग्रक्रमाने वाटचाल करेल असा ठाम विश्वास माजी आमदार नारायण पाटील यांनी बोलून दाखवला व करमाळा तालुक्यातील आदिनाथला ऊस देऊन सहकार जिवंत ठेवण्याचे काम सभासदांनी करावे असे आवाहन पाटील यांनी केले.